गुजरातच्या सूरत शहरात वाहतुकीच्या नियमाबाबत एक विचित्र घटना समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्ग ५३ वर चुकीच्या दिशेने सायकल चालविणाऱ्या ४७ वर्षीय एका रोजंदारी करणाऱ्या व्यक्तीविरोधात मोटर वाहन अधिनियमातंर्गत १०० रुपयांचे चलान कापण्यात आले आहे. या चलानची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. पोलिसांनी सायकल चालविणाऱ्याविरोधात मोटर वाहन अधिनियमांतर्गत कशी काय कारवाई केली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राजबहाद्दुर यादव नावाचा स्थलांतरित कामगार टेक्स्टाईल युनिटमध्ये काम करतो. यादव गुरुवारी सकाळी सचिन जीआयडीसी भागात रस्त्यावरुन जात होती. तेव्हा वाहतूक विभागाच्या एक महिला कॉन्स्टेबल कोमल डांगरने त्याला थांबवले आणि चुकीच्या दिशेने सायकल चालविण्याबाबत मोटर वाहन अधिनियमाअंतर्गत कलम १८४ अन्वये १०० रुपयांचे चलान फाडले. कलम १८४नुसार धोकादायक ड्राइव्हिंगसाठी हे चलान फाडले होते. मात्र नंतर, वरिष्ठ अधिकाऱ्याने कबुल केले की लावलेले कलम चुकीचे आहे.
यादव यांनी सांगितले की, मी कामासाठी सायकलने चुकीने दिशेने जात असताना गभेनी क्रॉसरोडजवळ ट्रॅफ़िक महिला पोलिसाने अडवले. चलान फाडले आणि मला कोर्टात हजर राहून दंड भरण्यास सांगितला. यादव उत्तर प्रदेशातील पांडेसार परिसरात कुटुंबीय राहतात. तो दिसलेला ४०० रुपये कमवतो आणि मी दंड कसा भरू अशी चिंता त्याने व्यक्त केली.