पुणे - घटस्फोटित महिलेने पुनर्विवाहासाठी विवाहविषयक संकेतस्थळांवर नाव नोंदणी केली खरी पण त्यातून झालेल्या ओळखीतून महिलेला व्यवसायाची ऑफर देऊन तब्बल ४९ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी धानोरी येथील एका ४९ वर्षाच्या महिलेने विश्रांतवाडीपोलिसांकडे फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या घटस्फोटित असून तिने पुनर्विवाहासाठी विवाहविषयक दोन संकेतस्थळावर नाव नोंदणी केली होती. त्यावरुन एकाने त्यांच्याशी संपर्क साधला. त्याने आपला नेदरलँड येथे बियाणे विक्रीचा व्यवसाय असल्याचे सांगितले. आपली बियाणे जगभरातील विविध देशात विक्री होते. भारतातही आमच्या कंपनीची बियाणे विक्री केली जाते. या व्यवसायात तुम्ही गुंतवणुक करा. त्यात मोठा फायदा असल्याचे सांगितले. त्याच्या गोड बोलण्याला या महिला भुलल्या व त्यांनी तो सांगेल, त्याप्रमाणे वेळोवेळी ६ मार्च ते २८ ऑगस्ट २०१९ दरम्यान बँकेच्या खात्यात पैसे भरत गेल्या. एकूण ४९ लाख १५ हजार ४०० रुपये भरले. त्यानंतर त्यांना आपण फसवले गेलो असल्याचे लक्षात आले. त्यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.