हावडा : झारखंडच्या तीन काँग्रेस आमदारांच्या गाडीत ४९ लाखांची रोकड आढळली होती. एवढी मोठी रक्कम सोबत बाळगण्याचे कारण ते सांगू शकले नाहीत. त्यामुळे पश्चिम बंगालच्या हावडा ग्रामीण पोलिसांनी रविवारी त्यांना अटक केली.
या आमदारांची एसयूव्ही काल सायंकाळी महामार्ग क्रमांक १६ वरील राणीहाती येथे अडवून हावडा ग्रामीण पोलिसांनी झडती घेतली. तेव्हा गाडीत ही रोकड आढळली. या आमदारांना एवढी मोठी रोकड घेऊन जाण्याचे कारण सांगता आले नाही. आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप करायचे आहे. साड्या खरेदी करण्यासाठी हे पैसे घेऊन आम्ही प. बंगालला आलो होतो, असा दावा इरफान अन्सारी, राजेश कच्छप, नमन बिक्सल कोंगरी या आमदारांनी केला. मात्र, त्यांचा दावा पटत नसल्याने अधिक चौकशीसाठी या आमदारांना त्यांचा चालक व अन्य एकासह आज अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. या पाच जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने या घटनेचा तपास हावडा ग्रामीण पोलिसांकडून स्वत:कडे घेतला आहे.
तिघांचेही निलंबनnपश्चिम बंगालमध्ये मोठ्या रकमेसह अटक करण्यात आलेल्या झारखंडमधील आपल्या तीन आमदारांना काॅंग्रेसने रविवारी निलंबित केले. भाजप झारखंडमधील आपले आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करतानाच झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील हे सरकार सुरक्षित व स्थिर असून कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास काॅंग्रेसने व्यक्त केला. nलोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे निर्लज्जपणे अस्थिर करून लोकशाहीचे तुकडे पाडण्यात येत आहेत. झारखंडमधील सरकार अस्थिर करण्यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत आहेत. वेळोवेळी आमदारांशी संपर्क साधण्यात येतोय, त्यांना प्रलोभने दाखवली जात आहेत, काहींना धमकावलेही जात आहे, असा आरोप त्यांनी केला.