बंगळुरू : कर्नाटकच्या पोलिसांनी आयडीबीआय़ बँकेच्या मॅनेजर महिलेला अटक केली आहे. सरकारी बँकेच्या मॅनेजरनेच ग्राहकांना चुना लावल्याचा अजब प्रकार समोर आल्याने पैसे ठेवायचे तरी कुठे आणि कोणाच्या विश्वासावर असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.
पोलिसांनुसार ३४ वर्षीय रिलेशनशिप मॅनेजर साजिलाने अनेकांच्या खात्यातून गुपचूप पैसे काढून ४.९२ कोटी रुपयांचा घपला केला होता. साजिलाची पोस्टिंग आयडीबीआय बँकेच्या मिशन रोडवरील ब्रँचमध्ये होती. पोलिसांनी तिच्याकडून २३ लाख रुपयांचे एलआयसी बाँड आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेला कॉम्प्युटर जप्त केला आहे. साजिलाची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
आरोपींनी २३ डिसेंबर २२ ला 4.92 कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. या सर्व पैसा एलआयसी बाँडमध्ये गुंतविण्यात आला होता. आयडीबीआय बँकेचे उप शाखाप्रमुख संगमेश्वर यांना या अफरातफरीचा सुगावा लागला. त्यांनी याची सम्पंगीरामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली तेव्हा बँकेची एक मॅनेजरच यामागे असल्य़ाचे समोर आले. साजिलावर पोलिसांनी अपरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे.
साजिलाने बंगळुरुच्याच गांधीनगर ब्रांचमध्ये काम करताना कथितरित्या ग्राहकांच्या खात्यातून 2.90 कोटी रुपये गडप केले होते. त्यानंतर त्यांनी एलआयसी बाँडमध्ये पैसे गुंतवले होते. बेंगळुरूमधील अप्परपेट पोलिस ठाण्यात साजिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.