लातूर : नवीन रेणापूर नाका परिसरात यशवंतनगर येथील अपार्टमेंटमध्ये साेमवारी पहाटे दराेडा टाकून पळून जात हारवाडी (ता. रेणापूर) शिवारातील उसाच्या फडात लपून बसलेल्या पाच दराेडेखाेरांच्या पाेलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांना लातूरच्यान्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील नवीन रेणापूर नाका परिसरात यशवंतनगर येथे असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये साेमवारी आंतरजिल्हा दराेडेखाेरांच्या टाेळीने सशस्त्र दराेडा टाकत साेन्याचे दागिने, राेकड असा एकूण १४ लाख रुपयांवर मुद्देमाल लंपास केला हाेता. त्यानंतर दराेडेखाेर हे दुचाकीवरून रेणापूरच्या दिशेने पळून जात हाेते. याची माहिती पाेलिसांना मिळाली. दरम्यान, पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी विविध ठाण्यांच्या पाेलिसांना काेम्बिंग ऑपरेशनचे आदेश दिले. पाेलिस आपला सिनेस्टाइल पाठलाग करत असल्याने दराेडेखाेरांनी आपल्या दुचाकी रस्त्यावरच टाकून उसाच्या फडात लपून बसले हाेते. या उसाच्या फाडाला पाेलिसांनी घेराव घालत पाच दराेडेखाेरांना अटक केली. त्यांच्याकडून १४ ताेळे साेन्याचे दागिने जप्त केले हाेते.
पाेलिसांनी अटक केलेले महेश आसाराम चव्हाण (रा. काेल्हेरे, ता. गेवराई, जि. बीड), नितीन संजय काळे ऊर्फ बापू टंग्या काळे (रा. बालमटाकळी, ता. शेवगाव, जि. अहमदनगर), आदेश ऊर्फ लाल्या शकील चव्हाण (रा. सालवडगाव, ता. पैठण), विकास रामभाऊ भाेसले (रा. उमापूर, ता. गेवराई), रवींद्र संजय काळे (रा. बालमटाकळी) या पाच दराेडेखाेरांना लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली, अशी माहिती विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी दिली. तर या घटनेतील सहाव्या जखमी झालेल्या फरार दराेडेखाेराच्या अटकेसाठी पाेलिस पथक मागावर आहे.