मुंबई : स्टेट बँकेच्या एका शाखेत रोखपाल प्रमुख (कॅश इन चार्ज) पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने बँकेच्या तिजोरीतून ५ कोटी २३ लाख रुपयांची रोख आणि सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याचे उघडकीस आले असून या रोखपाल प्रमुखाला सीबीआयने अटक केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील नरसापूर येथील बँकेच्या शाखेत ए. नागेंद्र नावाची व्यक्ती रोखपाल प्रमुख म्हणून काम करते. शाखेतील सर्व रोख रक्कम आणि लॉकर्समध्ये जमा असलेला ऐवज याच्या व्यवहाराची आणि देखरेखीची जबाबदारी त्याच्यावर होती. तसेच तिजोरीच्या चाव्याही त्याच्याच ताब्यात असतात. २१ जून रोजी नागेंद्र बँकेत कामावर आला नाही. त्यावेळी बँक शाखेच्या मॅनेजरने त्याला फोन करून त्याच्या ठावठिकाणाबद्दल माहिती विचारली. मात्र, एका नातेवाइकाचा मृत्यू झाल्यामुळे आपण बँकेत अर्धा तास उशिरा येत असल्याचे त्याने सांगितले.
मात्र, दुपार उलटून गेल्यावरही तो बँकेत आला नाही. त्यावेळी बँक मॅनेजरेने त्याला वारंवार फोन केले. मात्र, त्याचा फोन बंद असल्याचे आढळले. तसेच बँकेने त्याच्या घरीही एका कर्मचाऱ्याला पाठविले. मात्र, तो घरीही नव्हता. त्यानंतर दुपारी चारच्या दरम्यान बँकेचा एक ग्राहक बँकेत आला आणि त्याने बँकेत काम करणाऱ्या सफाई कामगाराला बँकेच्या तिजोरीच्या चाव्या सोपवल्या.
बँक मॅनेजरसह बँकेतील कर्मचारी या प्रकाराने चक्रावून केले आणि त्यांनी तिजोरी उघडून त्यातील रक्कम आणि ऐवजाची पडताळणी सुरू केली. यावेळी २ कोटी ३२ लाख रुपयांची रोकड, तारणापोटी बँकेत जमा असलेले ७२ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि तीन एटीएममध्ये भरण्यासाठी ठेवण्यात आलेल्या रकमेपैकी २ कोटी १९ लाख रुपयांची रोख अशी एकूण ५ कोटी २३ लाख रुपयांची रक्कम गायब असल्याचे निदर्शनास आले.
सीसीटीव्ही फुटेजमधून प्रकार उघडकीस- बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात नागेंद्र तिजोरी रूममध्ये गेल्याचे आणि काही संशयास्पद हालचाली करत असल्याचे निदर्शनास आले. - याप्रकरणी स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी सीबीआयकडे लेखी तक्रार दाखल केली. यानंतर सीबीआयने तपास हाती घेत केलेल्या शोधात त्याला अटक केली.