नवी दिल्ली - मनी लॉडरिंगप्रकरणी प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. यावेळी त्यांच्यासोबत प्रियांका गांधी देखील पोहोचल्या होत्या. मात्र त्या गेटवरुन माघारी परतल्या. ईडीने केलेल्या पाच तासांच्या चौकशीत रॉबर्ट वाड्रा यांना तुमची लंडनमध्ये संपत्ती आहे का असा प्रश्न विचारला असता नाही म्हणून सांगितले. तर तुमची लंडनमध्ये संजय भंडारीशी भेट झाली होती का ? या प्रश्नावर आठवत नाही. तसेच भंडारीचा ईमेल आयडी तुमच्याकडे कसा आला असा सवाल केला असता लक्षात येत नाही अशी रॉबर्ट वाड्रा यांनी उत्तरं दिली. उद्या पुन्हा वाड्राना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.
दुपारी 4 वाजल्यापासून रॉबर्ट वाड्रांची रात्री 8 वाजेपर्यंत तब्बल ५ तास चौकशी सुरु होती. लंडनमध्ये कोट्यवधींची बेहिशोबी मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप रॉबर्ट वाड्रांवर आहे. याच प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. त्यांनी लंडनमध्ये 12, ब्रायनस्टन स्क्वेअरजवळ 19 लाख पाऊंड रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे. या व्यवहारामध्ये मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र, वाड्रा यांनी हे आरोप फेटाळले आहेत. पटियाला न्यायालयाने आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी रॉबर्ट वड्रा यांना 16 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. रॉबर्ट वाड्रा यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. जामिनाबरोबर वाड्रा यांना न्यायालयात एक लाख रुपये भरावे लागणार असून त्यांना 6 फेब्रुवारीला चार वाजता कोर्टात हजर रहाण्यास सांगण्यात आलं होतं.सुनावणीदरम्यान ईडीने वाड्रा यांची परदेशातही संपत्ती असून त्यासाठी त्यांची चौकशी करणं गरजेचं असल्याचं सांगितलं होतं. स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. या वाड्रा यांच्याशी संबंधित कंपनीने 2008 मध्ये ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून 3.5 एकर जमीन 7.50 कोटी रुपयांना खरेदी केली. त्यानंतर स्कायलाइटने डीएलएफला हीच जमीन 58 कोटी रुपयांना विकली आणि 509 कोटी रुपये नफा कमाविला, असं एफआयआरमध्ये म्हटले आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना मनी लाँड्रिंगप्रकरणात दिल्ली कोर्टाकडून 16 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिवाय मनी लाँड्रिंग हा प्रकार गंभीर असून वाड्रा यांनी तपास अधिकाऱ्यांना याप्रकरणी सहकार्य करावं, असा आदेश कोर्टाने दिला होता.