थरारक! प्रेम संबंधातून ५ जणांची हत्या; शेतात १० फूट खड्ड्यात मृतदेह पुरले, पोलिसांनी JCB आणला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 05:16 PM2021-07-04T17:16:05+5:302021-07-04T17:17:20+5:30
मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात असलेल्या नेमावर येथे एका शेतात पोलिसांना २९ जूनच्या संध्याकाळी ५ जणांचे मृतदेह सापडले.
देवास – मध्य प्रदेशातील देवास येथे ५ जणांची निघृण हत्या झाल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेंद्र आणि त्याचा सहकारी करण या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. तर आरोपी राकेश निमोरे याला ताब्यात घेतलं आहे. सुरेंद्रचा भाऊ विरेंद्रला यालाही पोलिसांनी अटक करून जेलमध्ये पाठवलं आहे. आतापर्यंत या हत्याकांडात ७ जणांना अटक केली असून पोलीस या घटनेचा आणखी तपास करत आहेत.
मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात असलेल्या नेमावर येथे एका शेतात पोलिसांना २९ जूनच्या संध्याकाळी ५ जणांचे मृतदेह सापडले. हे सर्वजण १३ मेपासून बेपत्ता होते. माहितीनुसार, पोलीस या बेपत्ता लोकांचा शोध घेत होती. बेपत्ता झालेल्यांमध्ये १ महिला, ३ युवती आणि एका युवकाचा समावेश होता. पोलीस या प्रकरणाचा बारकाईने शोध घेत आहेत. तपासात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एक-एक आरोपींना बेड्या ठोकत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेंद्र राजपूत याच्या शेतात खड्डा खोदल्यानंतर ५ मृतदेह पोलिसांनी जप्त केले.
पोलिसांनी जेसीबीच्या मदतीनं १० फूट खड्डा खणत हे सगळे मृतदेह बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ आयजी योगेश देशमुख नेमावर येथे पोहचले. योगेश देशमुख यांनी माध्यमांना सांगितले की, हे क्रूर हत्याकांड सुरेंद्र आणि रुपाली या दोघांच्या प्रेम प्रकरणातून झालं आहे. सुरेंद्रचं मृत युवती रुपालीसोबत प्रेम संबंध होते. मात्र सुरेंद्रचं लग्न दुसऱ्या मुलीशी ठरलं होतं. प्रेयसी रुपालीसोबत सुरेंद्रला कंटाळा आला होता. रुपालीने सुरेंद्रच्या होणाऱ्या बायकोचा फोटो सोशल मीडियात व्हायरल केला होता. सुरेंद्रचं लग्न होऊ नये यासाठी रुपाली प्रयत्नशील होती. त्याच कारणाने सुरेंद्रने तिचा काटा काढण्याचं ठरवलं आणि सहकाऱ्यांसोबत त्याने क्रूर हत्याकांड घडवलं असं पोलीस म्हणाले.
मृतांमध्ये ममता(४५), रुपाली(२१), दिव्या(१४), पूजा(१५) पवन(१४) यांचा समावेश आहे. हे सर्व आदिवासी भागातून येत असून नेमावर येथे भाड्याने रुम घेऊन राहत होते. आरोपीने या सगळ्यांची हत्या करून मृतदेहाची लवकर विल्हेवाट लावावी यासाठी खड्ड्यात मीठ आणि खतही टाकलं होतं. युवती रुपाली, दिव्या आणि पूजा यांचा मृतदेह निर्वस्त्र सापडला त्यामुळे या तिघींसोबत बलात्कार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नेमावर पोलिसांनी या हत्येशी निगडीत मुख्य आरोपी सुरेंद्र राजपूतसह ७ जणांना अटक केली आहे. घटनेनंतर आरोपी राकेश रुपालीचा मोबाईल वापरत असल्याचं समोर आलं. रुपाली मोबाईल अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. याच मोबाईलमधून सुरेंद्र आणि त्याच्या होणाऱ्या बायकोचा फोटो व्हायरल झाला होता. याच मोबाईलचा वापर करून राकेशनं रुपाली असल्याचा बनाव करून पवन आणि पूजाला मेसेज केला होता. मी रोहित नावाच्या मुलाशी लग्न केले आहे. आमची चिंता करू नका, आम्ही जिथे कुठे आहोत सुरक्षित आहोत.