पिंपरी : इमेल आयडी हॅक करून कंपनीच्या खात्यातून ५ लाख २२ हजार १७३ रुपये अज्ञाताने स्वत:च्या खात्यावर वळते करून घेतले. मात्र याबाबत बँकेकडे तक्रार करून सदरचे खाते बंद करून पुन्हा ही रक्कम संबंधित कंपनीच्या खात्यात वर्ग करण्यात आली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी राहुल सुभाष खिरे (वय ४२, रा. सातारा रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पिंपरीतील मोरवाडी न्यायालयासमोर चिंचवड एमआयडीसीत फोरबेस कंपनी आहे. राहुल खिरे यांच्या या फोरबेस कंपनीच्या बँकेच्या खात्यातून ५ लाख २२ हजार १७३ रुपये अज्ञाताने स्वत:च्या खात्यावर वळते करून घेतले. आरोपीने इमेल हॅक करून ही फसवणूक केली. ३१ मे ते ११ जून २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला. ही बाब लक्षात येताच फिर्यादी राहुल खिरे यांनी बँकेकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर बँकेने सदर खात्याचे आर्थिक व्यवहार बंद केले. तसेच फिर्यादी खिरे यांच्या कंपनीच्या संबंधित बँक खात्यात सदरची रक्कम वर्ग करण्यात आली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
इमेल हॅक करून सव्वापाच लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 17:07 IST