मुंबईः महाराष्ट्रातच नव्हे तर देशात गाजलेलं, जातीय तणाव वाढवणारं कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण नक्षलवाद्यांनी भडकवल्याचे पुरावे कथित माओवादी 'थिंक टँक'च्या पत्रव्यवहारांमधून सापडले असल्याचा खळबळजनक दावा अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.
कोरेगाव भीमा हिंसाचार भडकवण्यासाठी पाच लाख रुपये दिल्याचा उल्लेख एका पत्रात आहे. तर, हा हिंसाचार परिणामकारक झाल्याचा उल्लेख नक्षलवाद्यांचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे याने रोना विल्सन याला लिहिलेल्या पत्रामध्ये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. इतकंच नव्हे तर, देशात मोठी फळी उभारण्याचा कट रचला जात होता, त्यासाठी दुसऱ्या देशातील शक्तींची मदत घेण्याच्या हालचालीही सुरू होत्या, असा गौप्यस्फोट महाराष्ट्र पोलिसांनी केला आहे.
दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी देशभरात धडक कारवाई करून पाच जणांना अटक केली होती. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या कोरेगाव भीमा हिंसाचारासंदर्भात ठिकठिकाणी धाडी टाकल्या होत्या. कवी वारा वारा राव (हैदराबाद), इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीचे संपादकीय सल्लागार गौतम नवलाखा (दिल्ली), मानवी हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज (फरिदाबाद), व्हर्नोन गोन्साल्विस (मुंबई) आणि अरुण फरेरा (ठाणे) यांच्या अटकेनं देशभरात खळबळ उडाली होती आणि राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले होते. परंतु, हे सर्व जण माओवाद्यांचे थिंक टँक असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा संशय पोलिसांना होता. आनंद तेलतुंबडे आणि फादर स्टॅन स्वामी यांच्या घरांचीही झडती घेण्यात आली होती.
या संपूर्ण कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयानं पुणे पोलिसांना फटकारलं होतं आणि अटक केलेल्या पाचही जणांना कोठडीऐवजी नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर, आपल्या धडक धाडींमध्ये सापडलेल्या काही पत्रांमधून, ई-मेलमधून समोर आलेली स्फोटक माहिती आज पुणे पोलीस आयुक्त आणि अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
कोण आहे मिलिंद तेलतुंबडे?
मिलिंद तेलतुंबडे हा नक्षलवाद्यांचा म्होरक्या आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या बहिणीचे पती आनंद तेलतुंबडे यांचा मिलिंद हा भाऊ आहे. आंध्रप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात तो समांतर सरकार चालवण्यासाठी कुप्रसिद्ध आहे.