चंदीगड - पंजाबच्या जालंधर इथं एकाच कुटुंबातील ५ सदस्यांचा मृत्यू झाला आहे. ही आत्महत्या असावी असा पोलिसांना अंदाज आहे. जालंधरच्या आदमपूर इथं ही खळबळजनक घटना घडली. कर्ज फेडता आले नाही त्यामुळे घरच्या कर्त्या पुरुषाने आधी सर्वांची हत्या केली त्यानंतर स्वत:आत्महत्या करत आयुष्य संपवलं. या मृतांमध्ये एक पुरुष, ३ महिला आणि एका ३ वर्षाच्या चिमुरड्याचा समावेश आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहे.
या ५ मृतांमध्ये मनमोहन सिंग, त्यांची पत्नी सरबजीत कौर, दोन मुली ज्योती आणि गोपी आणि ज्योतीचा ३ वर्षीय मुलगा अमन अशी मृतांची ओळख आहे. मनमोहन सिंग यांचा जावई सरबजीत सिंग यांनी काही वेळ घरच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु कुणीही फोन उचलत नव्हते. त्यानंतर सरबजीत सिंग सासरी पोहचला तेव्हा मनमोहन सिंग आणि त्यांची पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले. तर ज्योती, गोपी आणि ३ वर्षाच्या चिमुरड्याचा मृतदेह बेडवर पडला होता. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
या घटनेची रात्री साडे आठ वाजता माहिती मिळताच पोलीस अधिकारी मंजित सिंग आणि आदमपूर पोलीस अधीक्षक विजय कुंवर सिंग घटनास्थळी पोहचले. तपासावेळी एक सुसाईड नोट आढळली. मनमोहन सिंग यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या या सुसाईड नोट म्हटलं होतं की, वादविवाद आणि कर्जापासून सुटका होण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे म्हटलं. या सर्व मृतांच्या शरीरावर मानेवर खूणा आहेत. या सर्वांचा मृत्यू फास घेतल्यानं झाल्याचे दिसून येते. अमनच्या गालावर जखमा आहेत. ज्यात कुणीतरी त्याला फासावर लटकावून मारल्याचे दिसते. पोलिसांनी सर्व मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले आहेत.
मनमोहन सिंग हे आदमपूर पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमास्टर म्हणून काम करायचे. गावातील काही लोकांकडून त्यांनी कर्ज घेतले होते अशी माहिती तपासात समोर आली आहे. घटनेनंतर मनमोहन सिंग यांचा मुलगा चरणप्रीत सिंग याला घटनेची माहिती देण्यात आली. चरणप्रीत हा ऑस्ट्रेलियात राहतो. २ वर्षाआधी चरणप्रीत ऑस्ट्रेलियाला गेला होता. मनमोहन सिंग यांनी सुसाईड नोटमध्ये माझ्या मृत्यूनंतर कुणालाही त्रास देऊ नका असं म्हटलं आहे. तर पोलीस या घटनेचा क्राईम सीन पुन्हा करत आहेत. सुसाईड नोट फॉरेन्सिक लॅबला पाठवली आहे. मनमोहन सिंग यांची हँडरायटिंग तपासली जात आहे.