मुंबई - आयपीएल मॅचदरम्यान मुंबई आणि उपनगरात क्रिकेट सामन्यांवर मोठ्या प्रमाणावर सट्टेबाजी सुरु असून करोडो रुपये बेकायदेशीर आर्थिक व्यवहार होत असल्याचे आणि त्यामागे आंतरराष्ट्रीय सट्टेबाजांचे रॅकेट कार्यरत असल्याने सट्टा लावणाऱ्या पाच जणांना कांदिवली येथून गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने अटक केली आहे. अब्दुल कादिर गफार छुटानी (२७), मिलिंद रमेश सोनी (२९), युसूफ मोहम्मद सुमार (५१), रोनी नवनीत रायचुरा (३४), मनोज सूर्यकांत लोटलीकर (२५) अशी या पाच आरोपींची नावे आहेत.
चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही इसम बंद घरात लपूनछपून आयपीएल सिरीज राजस्थान रॉयल आणि किंग इलेव्हन पंजाब यांच्यामध्ये जयपूर येथे सुरु असलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कांदिवली पश्चिमेकडील ऑस्कर रुग्णालयाजवळील रहिवाशी इमारतीत छापा टाकून या पाच आरोपींना अटक केली. या आरोपींकडून सट्टा लावण्यासाठी लागणारे साहित्य २६ मोबाईल फोन, एक लॅपटॉप, एक टीव्ही संच, एक सेटअप बॉक्स, दोन वायफाय राउटर, सहा कार्ड स्वॅपिंग युनिट्स, दोन डोंगल, तीन पेन ड्राइव्ह, एक नोटा मोजण्याचे मशीन आणि ९१ हजार ७०० रुपये पोलिसांनी जप्त केले आहे. या पाच जणांना १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.