मीरारोड - मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल मीरा भाईंदरमधील ५ पोलिस उपनिरिक्षकाना केंद्र शासनाने जाहीर केलेले "आंतरिक सुरक्षा पदक " देऊन सन्मानित करण्यात आले. तर सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले याना महाराष्ट्र शासनाचे विशेष सेवा पदक देण्यात आले.
मंगळवारी प्रजासत्ताक दिनी मीरारोड येथील पोलीस आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात दाते यांच्या हस्ते सदर पोलीस अधिकाऱ्यांना पदक देण्यात आली. मीरा भाईंदर मधील नयानगर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सुहेल पठाण , पोलिस उपनिरीक्षक आशुतोष चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक सुनील साळुंखे तर नवघर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक प्रमोद पाटील व काशिमीरा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक धनंजय गायकवाड यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदकाने गौरवण्यात आले.
ह्या पाच पोलिस उपनिरीक्षकांनी २०१६ ते २०१९ दरम्यान गडचिरोली सारख्या अतिदुर्गम नक्षली भागात उल्लेखनीय काम केल्या बद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आंतरिक सुरक्षा पदक जाहीर करण्यात आले होते. तर नवघर - नया नगर भागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ . शशिकांत भोसले यांना शासनाचे विशेष सेवा पदक देण्यात आले आहे . भोसले ह्यांनी देखील गडचिरोती ह्या नक्षल भागात २०१७ ते २०१९ दरम्यान खडतर सेवा बजावली होती .
पोलीस आयुक्तालयातील प्रजासत्ताक दिनाच्या ह्या कार्यक्रमात अतिरिक्त पोलीस आयुक्त एस . जयकुमार , पोलीस उपायुक्त विजयकांत सागर व अमित काळे , सहाय्यक आयुक्त विलास सानप आदी अधिकारी उपस्थित होते .