मानवी तस्करी आणि वेश्या व्यवसाय प्रकरणात इंदूर पोलिसांना मोठं यश हाती लागलं आहे. मुंबईच्या नालासोपारा भागात राहणारा विजय कुमार दत्त २५ वर्षापूर्वी बांग्लादेशातून आला होता. आतापर्यंत त्याने ५ हजारहून अधिक मुलींचा खरेदी-विक्रीचा व्यापार केला आहे. या मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्याचं काम तो करत होता. विजय दत्त इंदूरच्या बाणगंगा भागात आला होता.
इंदूर पोलिसांच्या विशेष पथकानं बाणगंगा भागातील कालिंदी गोल्ड सिटीत उज्ज्वल ठाकूरच्या घरातून विजय दत्त आणि त्याचा साथीदार बबलू याला अटक केली. विजय इंदूरला उज्ज्वल, बबलू आणि सैजलच्या मदतीने वेश्या व्यवसाय हब बनवू इच्छित होता. इंदूरहून फ्लाइट, बस आणि ट्रेन सहजपणे उपलब्ध होत असल्याने मुलींचा पुरवठा करणं सोपं होतं. तो इंदूरहून सूरत, राजस्थान आणि मुंबईसह अन्य ठिकाणी मुलींचा पुरवठा करणारी साखळी करण्याच्या प्रयत्नात होता. इंदूर पोलीस महानिरीक्षक हरिनारायणचारी मिश्र म्हणाले की, विजय कुमार दत्त यांनी कबूल केलंय की तो २५ वर्षापूर्वी अवैधरित्या बांग्लादेशातून भारतात येऊन मुंबईत वास्तव्य करत होता. बनावट मतदार कार्ड, आधार कार्ड बनवलं त्यानंतर पासपोर्ट बनवलं. तो पत्नीला भेटण्याच्या बहाण्याने बांग्लादेशला जात होता आणि त्याआडूनच मुलींच्या खरेदीविक्रीचा धंदा करायचा.
१० लग्न, १०० पेक्षा अधिक प्रेयसी
आरोपी विजय दत्तनं पोलिसांना सांगितले की, तो बांगलादेशातील शबाना आणि बख्तियार यांच्यामार्फत गरीब घरातील मुलींना नोकरीच्या बहाण्याने भारतात आणत असे. पुढे तो त्यांना वेश्या व्यवसायात ढकलत होता. तो बांगलादेशी मुलींना मुंबईतील नालासोपारा आणि इतर ठिकाणी लपवून ठेवायचा. विजयने १० मुलींशी लग्न केलं आहे. त्याच्या १०० हून अधिक गर्लफ्रेंड आहेत, ज्यांच्याकडून तो देहव्यापार करून घेतो.
दलालांची साखळी बनवली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय दत्तने इंदूर, धार, अलीराजपूर, झाबुआ, सुरत, अहमदाबाद, जयपूर, बंगळुरूसह अनेक शहरांमध्ये दलालांची साखळी तयार केली होती. पोलिसांना विजयच्या ताब्यात असलेल्या शेकडो मुलींची माहिती मिळाली. विजयने त्यांना दलालांमार्फत वेगवेगळ्या शहरात पाठवले आहेत. असे अनेक व्हिडिओ देखील समोर आले आहेत, ज्यामध्ये तो हातात दारूची बाटली घेऊन मुलींसोबत डान्स करत आहे. पोलिसांनी ४ मुलींना ताब्यात घेतले असून त्यात २ बांगलादेशी आहेत.
शेतात, नाल्यांमधून तस्करी
विजयनगर पोलिस ठाण्याच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एका बांगलादेशी तरुणीने काही लोकांकडे तक्रार केली होती. त्यानेच पोलिसांना सांगितले की, शबाना आणि बख्तियार यांनी जौशूर (बांगलादेश) येथून शेत आणि नाले ओलांडून त्यांना भारतीय हद्दीत प्रवेश करून दिला. नंतर त्याला विजयकडे आणण्यात आले. जेव्हाही ती बांगलादेशात परतण्याबाबत बोलायच्या तेव्हा त्यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली जायची असा आरोप मुलींनी केला.