मुंबई - कर्ज फेडायला पैसे हवे म्हणून अवघ्या एक लाखासाठी पाच वर्षांच्या मुलाचे अपहरण करणार्या आरोपीला साकीनाका पोलिसांनीअटक केली आहे. ८ तासात आरोपीच्या मुसक्या आवळून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून मुलाची सुटका केली.
साकीनाकाच्या काजूपाडा परिसरातील जरीमरी येथे एका चाळीत असलेल्या गारमेंटमध्ये शाकिर सुलेमान शेख (वय - 38) हा कामाला आहे. काल सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांचा ५ वर्षांचा मुलगा घराबाहेरून अचानक गायब झाला. त्यांनी परिसर पिंजून काढला. मात्र, त्याचा कुठेच पत्ता लागत नव्हता. दरम्यान, दुपारी तीनच्या सुमारास शेखला एक निनावी फोन आला आणि तुझा मुलगा माझ्या ताब्यात आहे. तो जिवंत पाहिजे असल्यास १ लाख रुपये दे अशी मागणी फोनवरून अज्ञात व्यक्ती करू लागला. मुलाचे अपहरण झाल्याचे स्पष्ट होताच शाकिरने साकीनाका पोलीस ठाणे गाठले. याची तात्काळ गंभीर दखल घेत सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील माने व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. शाकिरच्या घरापासून दोन किलो मीटरच्या अंतरावर राहणारा अक्रम खान (वय - 19) यानेच मुलाचे अपहरण केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. अक्रमला पोलिसांनी अटक केली. हातगाडीवर मोसंबी ज्युसचा धंदा करणार्या अक्रमने मुलाचे अपहरण करून त्याला प्रेयसीच्या मैत्रीच्या घरी लपवून ठेवले होते. अक्रमच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिसांनी अपहृत मुलाची देखील सुटका केली. चौकशीत अक्रमने गुह्याची कबुली दिली. एका खासगी व्यक्तीकडून एक लाखाचे कर्ज घेतले होते. त्याचे पैसे परत फेडायचे होते. त्यासाठी एक लाख हवे म्हणून मुलाचे अपहरण करण्याचा शक्कल डोक्यात आली. त्यामुळे शाकिर शेखच्या मुलालाच टार्गेट करायचे ठरवून त्याचे अपहरण केल्याचे त्याने सांगितले.