अकोला - चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उमरा येथील एका युवतीच्या घरात घुसुन तीचा विनयभंग करणाºया तसेच जातीवाचक शिवीगाळ करणाºया आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी पाच वर्षांची शिक्षा सुनावली. सुनील पुंडे असे आरोपीचे नाव आहे. त्याला विविध कलमान्वये २० हजार हजार रुपयांचा दंड ठोठावला असून दंड न भरल्यास आणखी शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.उमरा गावामध्ये २२ वर्षीय युवती २२ जानेवारी २०१० रोजी घरात एकटी होती. ही संधी साधून आरोपी सुनील प्रल्हाद पुंडे (३२, रा. उमरा) याने तिच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर युवतीला देशी व विदेशी दारुची मागणी करीत तीचा विनयभंग केला. युवतीने आरडा-ओरड केली असता आरोपीला तीला जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. युवतीने सदर प्रकार कुटुंबीयांना सांगीतल्यानंतर कुटुंबीयांसह चान्नी पोलिस स्टेशन गाठून सुनील पुंडे याच्याविरुध्द चान्नी पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर बाळापूर उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आरलॅड यांच्या न्यायालयात सरकार पक्षातर्फे ४ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीविरुध्द आढळलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीला जातीवाचक शिवीगाळ प्रकरणात ५ वर्षांची शिक्षा व ५ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी ६ महिने अतिरीक्त शिक्षेचे आदेश दिले आहेत. यासोबतच विनयभंग प्रकरणामध्ये २ वर्ष शिक्षा व ५ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान करण्यात आले आहे. तर जबरदस्तीने घरात घुसने या कलमान्वये १ वर्ष शिक्षा आणि २ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी १ वर्ष शिक्षा व २ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावासाचे आदेश न्यायालयाने बुधवारी दिले आहेत.