- राकेश कदम
साेलापूर : मुळेगाव राेडवरील साेनांकूर एक्साेर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसह आसरा चाैक, कुमठा नाका, हैदराबाद राेडवरील भंगार विक्रेते, बांधकाम साहित्य, स्टील विक्रेत्यांवर आयकर विभागाने साेमवार ते गुरुवार असे चार दिवस छापे टाकले. या छाप्यांमध्ये सुमारे ५० काेटी रुपयांचे बाेगस व्यवहार आढळून आल्याची माहिती आयकर अधिकाऱ्यांनी ‘लाेकमत’ला दिली.
आयकर विभागाने दाेन महिन्यांपूर्वी शहरातील रुग्णालयांवर छापेमारी केली हाेती. यात रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई झाली. साेमवार ते गुरुवार असे चार दिवस आसरा चाैक परिसर, हैदराबाद राेड, कुमठा नाका परिसरात बीफ, भंगार विक्री, बांधकामाचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर छापेमारी झाली. या व्यावसायिकांनी भंगार, साहित्य विक्रीमध्ये माेठ्या प्रमाणावर राेखीने व्यवहार केले. राेखीने झालेले व्यवहार आणि कागदाेपत्री झालेल्या व्यवहारांमध्ये सुमारे ५० काेटी रुपयांची तफावत आढळून आली. भंगार विक्रेत्यांनी खरेदी दर कमी दाखविले आहेत. आयकर अधिकाऱ्यांनी कच्च्या नाेंदी असलेली कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. राेखीच्या व्यवहारातून माेठ्या प्रमाणावर करचाेरी झाली आहे. ही करचाेरी कधीपासून झाली, या करचाेरीमध्ये इतर काेण-काेण सहभागी आहेत याची तपासणी सुरू आहे.
मुंबई, काेल्हापुरातील कार्यालयातून कागदपत्रे ताब्यात
मुळेगाव राेड साेनांकूर एक्साेर्ट लिमिटेड ही कंपनी कत्तलखाना चालविते. या कंपनीच्या मुंबई, काेल्हापूरसह विविध कार्यालयांवर छापे टाकले. येथून कागदपत्रे ताब्यात घेतली. यातून बेनामी व्यवहारांचा शाेध सुरू असल्याचे आयकर अधिकाऱ्यांनी सांगितले.