झारखंडच्या पाकुडमध्ये मृतदेहाची मागणी करणाऱ्या पत्नीला पती जिवंत समोर आला त्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. पाकुडच्या अमडापाडा ठाणे हद्दीतील बोहडा गावातील रहिवासी महेश्वर टुडू याला पोलिसांनी जिवंत कोर्टात उभं केलं. कोर्टात सुनावणी झाल्यानंतर महेश्वर टुडू याला त्याच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले. महेश्वर टुडू गेल्या मार्च महिन्यात पाकुड जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला होता.
या प्रकाराची दखल घेत नातेवाईकांनी पोलिसांवर दबाव टाकून महेश्वर टुडूच्या हत्येची एफआयआर नोंदवली होती. कुटुंबाने या प्रकरणात काही नातेवाईकांवर आरोप करत महेश्वर टुडूच्या हत्येला जबाबदार धरलं होतं. पोलिसांनी ३ नातेवाईकांना अटक करून जेलमध्ये परंतु हे तिघंही निर्दोष असल्याचं आता समोर आलं आहे. पोलिसांनी महेश्वर टुडूला ताब्यात घेतलं. त्यानंतर तपासात कळालं की, महेश्वर टुडूची पत्नी, कुटुंब आणि काही सहकाऱ्यांनी मिळून दोन वेळा रस्ता जाम करून गोंधळ घातला होता. महेश्वरच्या कुटुंबाने आणि गावकऱ्यांनी मिळून ३ निर्दोष लोकांना पोलिसांनी जेलमध्ये पाठवलं.
या प्रकारावर एसपी मणिलाल मंडल म्हणाले की, जमीन हडप करण्याच्या हेतून महेश्वर टुडूच्या कुटुंबाने हे षडयंत्र रचलं होतं आणि महेश्वर टुडूला गुपचूप बंगळुरूला पाठवलं होतं. कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे बंगळुरूत महेश्वरला काम मिळालं नाही म्हणून २ महिन्यानंतर तो पुन्हा परतला आणि नातेवाईकाच्या घरी लपला होता. अमडापाडा पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी महेश्वर टुडूला ताब्यात घेतलं आणि कोर्टात हजर केले. मृतदेहाची मागणी करणाऱ्या पत्नीला पती जिवंत समोर उभा केल्यानंतर सगळ्यांची भंबेरी उडाली.
या प्रकरणात महेश्वर टुडूच्या कुटुंबाने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी रस्ता जाम केला होता. हत्येचा खोटा आरोप करत आरोपींच्या घरी तोडफोड केली त्याच्या घरातील लोकांना मारहाण केली. आता या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला असून निर्दोष व्यक्तींना जेलमधून सोडून आरोपींवर कारवाई करण्यात येत आहे.