विशाल सोनटक्के, यवतमाळ: येथील जगदंबा नगरीमध्ये राहणारे गजानन लक्ष्मण ढवळे यांना २ ऑगस्ट रोजी पोस्टमनने लाल रंगाचा लिफाफा हाती सोपवला. ढवळे यांनी हे पाकीट उघडले असता, त्यातील पत्र पाहून त्यांना धक्काच बसला. या पत्रात ‘मी गडचिरोली नक्षल दलंग कमांडर क्र. ३८ असून, मला ५० लाख रुपये द्या अन्यथा तुम्हाला जीवे मारण्यात येईल’, अशी धमकी देण्यात आली होती. हे पत्र वाचल्यानंतर ढवळे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी गुरुवारी घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नक्षल दलंग कमांडरच्या नावे आलेल्या या पत्रात हिंदीमध्ये गजानन ढवळे यांच्याकडे थेट खंडणीची मागणी करण्यात आली आहे. ‘ढवळे तुम्हाला लाल सलाम, तुम्ही मला ५० लाख रुपये द्या. याकडे कानाडोळा केल्यास आपल्या परिवारातील सदस्यांना जीवे मारु’, असे या पत्रात नमूद केलेले होते. तसेच १२ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता उमरी ते करंजी रस्त्यापासून तीन किलोमीटर अंतरावर हनुमान मंदिराजवळील दर्ग्याच्या मागे ५० लाखांची ही रक्कम आणून ठेवण्यास सांगण्यात आले होते. हे धमकीचे पत्र वाचल्यानंतर ढवळे घाबरले. दरम्यान, हे पत्र कोठून आले, कोणी लिहिले हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. ढवळे यांच्या तक्रारीवरून घाटंजी पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.