मीरा रोड : आपली सख्खी मेहुणी व साडूला यूएलसी कोट्यातील सदनिका घेऊन देतो, असे सांगून ५० लाखांना गंडा घालणाऱ्या इस्टेट एजंटविरोधात नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.मीरा रोडच्या शांतीपार्कमध्ये राहणारे मनीषा शाह व समीर शाह दाम्पत्य हे इस्टेट एजंटचे काम करतात. मनीषा यांची सख्खी बहीण तृप्तीचा नवरा सुरेंद्रसिंह नयालही इस्टेट एजंटचे काम करत असून शांतीनगर सेक्टर ५ मध्ये कार्यालय होते. नयाल याने शाह दाम्पत्यास २०१२ मध्ये कांंदिवलीच्या ठाकूर व्हिलेजमधील विष्णू शिवम टॉवरमध्ये यूएलसी कोट्यातील सदनिका स्वस्तात मिळवून देतो, असे सांगितले.नयाल याने शाह दाम्पत्यास त्या इमारतीत नेले व सदनिका दाखवली. सदनिकेची किंमत बाजारभावाप्रमाणे १ कोटी ७० लाखांची असली, तरी तुम्हाला एक कोटी दोन लाखांत मिळवून देतो. त्यासाठी ७५ लाख रोखीने व २७ लाखांचा करार करावा लागेल, असे नयाल याने सांगितले. नयालवर विश्वास ठेवून शाह दाम्पत्याने त्यांची मीरा रोडच्या पूनम गार्डनमधील सदनिका विकली तसेच काही परिचितांकडून पैसे घेऊन मार्च ते आॅगस्ट २०१२ दरम्यान नयाल याला ५५ लाख रुपये रोखीने दिले, तर एक लाखांचा धनाकर्ष सरकारच्या नावाने दिला.नंतर, त्याने शाह दाम्पत्याकडे उर्वरित २० लाख रोख आणि २७ लाख रुपये करारनाम्याची रक्कम म्हणून मागण्याचा तगादा लावला. परंतु, नयाल याने सदनिकेचे विवरणपत्र न दिल्याने शाह दाम्पत्याने उर्वरित रक्कम देण्यास नकार दिला.एक वर्षानंतर सरकारच्या नावाने दिलेला धनाकर्ष त्याने परत केला. तर, २०१६ मध्ये आपसात समझोतापत्र बनवून सहा महिन्यांत शाह दाम्पत्यास त्यांचे ५६ लाख देतो, असे नयालने सांगितले. पण, वारंवार तगादा लावूनही केवळ पाच लाख ६० हजार दिले. पण, नंतर उरलेले ५० लाख ४० हजार देण्यास टाळटाळ केली.शेवटी, तर सरळ नकार देत, तुम्हाला काय करायचे ते करा, असे नयालने सांगितले. अखेर, शाह दाम्पत्याने नयानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदनिकेचे आमिष दाखवून ५० लाखांना गंडा, इस्टेट एजंटविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 12:14 AM