पाकिस्तानात पुन्हा एकदा मंदिराला निशाणा बनवण्यात आलं आहे. पंजाब प्रांतातील सादिकाबाद जिल्ह्यातील भोंग शरीफ गावात असलेल्या गणेश मंदिरात बुधवारी संध्याकाळी काही समाजकंटकांनी तोडफोड केली. या तोडफोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मंदिरामध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्य संशयितांसह 50 जणांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. तसेच 150 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर हिंदू समुदायामध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेत आरोपींच्या अटकेचे आदेश दिले होते.
लाहोरपासून 590 किमीवर असलेल्या रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरामध्ये जमावाने हिंदू मंदिरावर हल्ला केला होता. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या आधारे मुख्य आरोपीसह 50 जणांना अटक करण्यात आली आहे. मंदिरात तोडफोड झाल्याची घटना लाजिरवाणी असल्याची भावना प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांनी व्यक्त केली. अशाच प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाईल, असे ते म्हणाले. मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मोठ्या प्रमाणात काही लोकं मंदिराच्या आत लाठी-काठ्या घेऊन शिरले होते. त्यानंतर मंदिरात तोडफोड सुरू केली.
पंतप्रधान कार्यालयाने घटनेची दखल घेतली असून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश
या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी कारवाई करत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला. तसेच पोलीस या घटनेचा तपासही करत आहेत. यादरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष सहाय्यक डॉ. शहबाज गिल यांनी ट्वीट करत ही घटना अतिशय दु:खद आणि खेदजनक असल्याचं म्हटलं. पंतप्रधान कार्यालयाने या घटनेची दखल घेतली असून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. पाकिस्तानचं संविधान अल्पसंख्यांकांना त्यांची पूजा स्वतंत्ररित्या करण्याचं स्वातंत्र्य आणि सुरक्षा देत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
या प्रकरणी इम्रान खान यांच्या सत्ताधारी पक्षाचे खासदार रमेश वंकवानी यांनी भोंग शरीफ या ठिकाणी झालेल्या मंदिराच्या तोडफोडीचं कृत्य हे खेदजनक असल्याची प्रतिक्रिया दिली. दोषींना अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, असं म्हणत त्यांनी पाकिस्तानच्या मुख्य न्यायाधीशांकडेही दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.