लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लैंगिक क्षमता तात्पुरती वाढविणाऱ्या मात्र शरीरावर विपरीत परिणाम करत असल्याने बॅन अशा व्हायग्रा, सीआलीस आणि लीव्हेट्रा (गोळी आणि जेल) सारखी औषधे ५० टक्के डिस्काउंटवर मिळतील, अशी ऑफर देत क्रेडिट व डेबिट कार्डने अमेरिकन नागरिकांकडून डॉलर्स घ्यायचे. मात्र, त्यानंतर त्यांची फसवणूक करणाऱ्या ५ जणांच्या टोळक्याला बोरिवली पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे.
आरोपींनी यासाठी गोराईमध्ये उभारलेले एक अवैध कॉल सेंटर देखील उद्ध्वस्त करण्यात आले आहे. बोरवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांना माहिती मिळाली होती की लाइफस्टाइल फिटनेस प्रोडक्शन नावाखाली बोरिवलीतील भीमनगर येथील बंगल्यात इंटरनेटवर अमेरिकन नागरिकांना कॉल केला जातो; कॉलर स्वतःला अमेरिकन नागरिक असल्याचे भासवत अमेरिकन ॲक्सेंटमध्ये संभाषण करत त्यांचा विश्वास संपादन करतो. त्यानंतर व्यवहार होतो. याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय माडये, सहायक निरीक्षक सागर साळुंखे उपनिरीक्षक प्रमोद निंबाळकर आणि पथकाने या कॉल सेंटरवर धाड टाकली. त्यांचा चौकशीमध्ये अनेक गोष्टी उघड झाल्या.
टोपण नावाने...हे कॉलर अमेरिकन नागरिकांचे टोपण नाव धारण करून त्याची माहिती प्राप्त करायचे. त्यानंतर बंदी असलेली औषधे तीस ते पन्नास टक्के सूट देऊन विकत देण्याचे आमिष दाखवायचे. त्या मोबदल्यात ते अमेरिकन नागरिकांकडून अमेरिकन डॉलरमध्ये पैसे घ्यायचे त्यानुसार पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्या लोकांनी अनेकांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे, असे बोरिवली पोलिसांनी सांगितले.