लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उच्च शिक्षण घ्यायला कॅनडात जाण्यासाठी विमान तिकीट बुकिंग करणाऱ्या जवळपास ५० विद्यार्थ्यांना ग्रुप बुकिंगच्या नावे लाखोंचा गंडा घातला गेला आहे. यामुळे त्यांचे परदेशात जाण्याचे स्वप्न फसवणुकीत बदलले असून याविरोधात वीणा आंबेरकर या महिलेविरोधात तक्रार करण्यासाठी पालकांनी बोरिवली पोलिस ठाण्यात धाव घेतली.
तक्रारदार २१ वर्षीय विद्यार्थी असून विलेपार्लेतील प्रसिद्ध कॉलेजातून ने वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याने कॅनडातील एका कॉलेजात पोस्ट ग्रॅज्युएट कोर्ससाठी अर्ज केला होता. कॉलेजची फी, गॅरेंटेड इन्व्हेस्टमेंट सर्टिफिकेट, व्हिसा, एंट्रन्स एक्झाम, ॲप्लिकेशन फी, निवासस्थान व्यवस्था आणि करन्सी कन्वर्जन यासाठी त्याने २० लाख खर्च केले. हा अभ्यासक्रम ५ सप्टेंबर रोजी सुरू होणार असल्याने कॅनडाला जाण्याचे तिकीट त्याला ऑनलाइन काढायचे होते.
बोरिवलीतच राहणाऱ्या एका मित्राने त्याला विमान तिकीट बुकिंग करणाऱ्या एजंट आंबेरकरचा पत्ता दिला. तक्रारदार विद्यार्थ्यांनी आंबेरकरला संपर्क साधत ऑगस्टमध्ये मुंबई ते कॅनडा विमानाचे तिकीट हवे असल्याचे सांगितले.
ग्रुप बुकिंग आणि करन्सी कन्व्हर्जन!
- आंबेरकरला भेटल्यानंतर एअर फ्रान्सच्या तिकिटाची रक्कम आणि कमिशन मिळून १ लाख २० हजार रुपये तिने मागितले. मात्र तडजोडीनंतर ग्रुप बुकिंगमध्ये १ लाख १५ हजार देण्याचे ठरले.
- तसेच करन्सी कन्व्हर्जनच्या नावे ३०० कॅनेडियन डॉलर्ससाठी तिने १८ हजार वेगळे घेतले. असे एकूण १ लाख ३३ हजार ३०० रुपये तिला गुगल पे मार्फत पाठविण्यात आले.
...म्हणे तांत्रिक अडचण
आंबेरकरने २५ मे रोजी तक्रारदाराला ट्रॅव्हल्स समरी आणि इन्व्हाॅईस कॉपी ई-मेल केली. चार दिवसांनंतर मात्र तिकीट रद्द झाले असून एमिरेट्सची तिकिटे बुक करण्याचे म्हटले. पुन्हा ती तिकिटेही बुकिंग होत नसून केएलएम कंपनीच्या नावाचे २ ऑगस्टचे तिकीट बुक केले आणि त्याचे पीएनआर विद्यार्थ्याला व्हाट्सॲपवर पाठविले. विद्यार्थ्याने या कंपनीच्या वेबसाइटवर तपासल्यावर मात्र तिकीट बुकिंग झालेच नसल्याचे उघड झाले. त्याने आंबेरकरला फोन केल्यावर तांत्रिक अडचणींमुळे तिकीट रद्द झाल्याचे ती म्हणाली.
अखेर गुन्हा दाखल
- आम्ही बोरिवली पोलिस ठाण्यात अनेक विद्यार्थी त्यांच्या पालकांसह आंबेरकरविरोधात तक्रार करायला आले होते. त्यापैकी माझ्या मुलासह बोरिवलीतील तीन विद्यार्थ्यांना तिने ३ लाख ५३ हजार ३०० रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले.
- जवळपास ५० हून अधिक विद्यार्थ्यांना तिने फसविल्याचे आम्हाला तेव्हा समजले. दरम्यान, आम्ही गुन्हा दाखल केला असल्याचे पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले.