वसई - तक्रार देणाऱ्या फिर्यादीकडून त्याच्यावरच गुन्हा दाखल न करण्याची धमकी देऊन २५ हजार रुपयांची लाच उकळण्याचा प्रकार माणिकपूर पोलीस ठाण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सहाय्यक पोलीस निरीक्षक आसिफ बेग यांना पोलीस ठाण्यातच सापळा रचून रंगेहाथ आरोपी आसिफला अटक करण्यात आली आहे.
वसईत राहणारे तक्रारदार मानसिंग सावंत यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात सरिता दोंदे या महिलेविरोधात अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल केला होता. बेग यांनी या प्रकरणात दोंदे यांची चौकशी केली. हे प्रकरण किरकोळ होते. मात्र, या प्रकऱणातून आर्थिक लाभ मिळावा यासाठी बेग यांनी आपला मोर्चा तक्रारदार सावंत यांच्याकडे वळवला. या प्रकऱणात सावंत यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आणि तो गुन्हा जर दाखल करायचा नसेल तर ५० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
सावंत तक्रार देण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांच्याकडेच लाच मागितल्याने सावंत यांनी ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे (एसीबी) तक्रार दिली. एसीबीच्या पथकाने माणिकपूर पोलीस ठाण्यात सापळा रचला होता. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता लाचेच्या रकमेतील २५ हजार रुपये स्विकारताना बेग यांना रंगेहाथ अटक कऱण्यात आली. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनयम (संशोधन २०१८) सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.