बदायूँ : निर्भया प्रकरणाची आठवण व्हावी इतक्या क्रूरपणे उत्तर प्रदेशातील बदायूँ जिल्ह्यात ५० वर्षे वयाच्या एका महिलेवर रविवारी सामूहिक बलात्कार करण्यात आला व तिची हत्या करण्यात आली. तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घुसविण्यात आली. याप्रकरणी एका पुजाऱ्यासह तिघांवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, दोघांना अटक केली आहे.
या बलात्कार प्रकरणावरून काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार टीका केली आहे. उत्तरप्रदेशातील हाथरस येथे गेल्या १४ सप्टेंबर रोजी १९ वर्षे वयाच्या दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. बलात्कार पीडितेच्या गुप्तांगात व पायांना जखमा झाल्याचे व मारहाणीत बरगड्या मोडल्याचे उत्तरीय तपासणीत आढळून आले. ही महिला देवळात दर्शनाला गेली होती. त्यानंतर ती मृतावस्थेत आढळली. या गुन्ह्यातील आरोपी असलेला पुजारी सध्या फरार असून, त्याचा कसून शोध सुरू आहे.
महिला सुरक्षिततेकडे दुर्लक्ष : प्रियांका गांधीकाँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सांगितले की, उत्तरप्रदेशमधील महिलांच्या सुरक्षिततेबाबत त्या राज्यातील प्रशासनाचा दृष्टिकोन चांगला नाही. हाथरसच्या बलात्कार प्रकरणात राज्य सरकारच्या प्रशासनाने पीडितेच्या म्हणण्याकडे दुर्लक्षच केले. बदायूँत जिथे बलात्कार झाला त्या ठिकाणाची पोलिसांनी तपासणीही केली नाही.