इटावा: लग्न जमवण्याचं आमिष दाखवून एका तरुणाची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातल्या इटावा येथे ही घटना घडली आहे. लग्न जमवताना सुंदर मुलगी दाखवून मंडपात मात्र ५० वर्षांची महिला समोर आल्यानं नवऱ्या मुलाला धक्का बसला. याबद्दल मुलानं आक्षेप नोंदवला. त्यानंतर मुलाला मारहाण करण्यात आली. त्याच्याकडे असलेले ३५ हजार रुपये खेचून घेण्यात आले. या प्रकरणाचा तपास सध्या इटावा पोलीस करत आहेत.
लग्न तर झालं नाही, उलट हाती असलेले पैसे गमावलेले शत्रुघ्न सिंह सध्या कायदेशीर कारवाईसाठी पोलीस चौकीच्या फेऱ्या मारत आहेत. त्यांच्यासोबत त्यांची आई इंद्रा देवीचीदेखील फरफट सुरू आहे. घरी सून येईल अशी आशा त्यांना होती. मात्र तसं न होता पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवावे लागत असल्यानं त्या निराश आहेत. नगलातील एका कुटुंबानं १० दिवसांपूर्वी लग्न ठरवलं होतं. १९ ऑगस्टला नीलकंठ मंदिरात मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी एक २० वर्षांची मुलगी दाखवण्यात आली, अशी माहिती शत्रुघ्न सिंह यांनी दिली.
लग्नासाठी २७ ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली. शत्रुघ्न लग्नासाठी नातेवाईकांना घेऊन विजयपुरातील कालीमातेच्या मंदिरात गेले. त्यावेळी त्यांच्या समोर नवरी म्हणून ५० वर्षांची महिला आली. त्यामुळे त्यांनी लग्न करण्यास नकार दिला. नगला येथील कुटुंबानं लग्न जमवतो सांगून ३५ हजार रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला. शत्रुघ्न यांनी दिलेले पैसे मागताच कुटुंबानं शत्रुघ्न यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या कुटुंबानं लग्नाच्या नावाखाली अनेकांना फसवल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.