मुंबई : आंतरराष्ट्रीय व्यापारात कार्यरत असलेल्या आणि केंद्र सरकारच्या मालकीच्या एमएमटीसी कंपनीला ५०४ कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी हैदराबाद येथील ज्वेलर्सची १५० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये १४९ कोटी १० लाख रुपयांच्या दागिन्यांसह १ कोटी ९६ लाख रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद, विजयवाडासह काही प्रमुख ठिकाणी कार्यरत असलेल्या एमबीएस ज्वेलर्स या कंपनीने एमएमटीसी कंपनीच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करत बायर्स क्रेडिट स्कीम योजनेंतर्गत कंपनीकडून वेळोवेळी सोन्याची उचल केली. सोन्याची उचल करतेवेळी सुरक्षा ठेव म्हणून पैसे देणे अपेक्षित होते, तसेच काही प्रमाणात परकीय चलनही सुरक्षा ठेव म्हणून देणे अपेक्षित होते. मात्र, एमबीएस कंपनीने या निकषांची पूर्तता केली नाही. मात्र, अधिकाऱ्यांना काही आमिष व काही गिफ्ट देत सोन्याची उचल सुरूच ठेवली. कंपनीच्या मुख्यालयापर्यंत हा प्रकार पोहोचला तेव्हा एमबीएस ज्वेलरचे संचालक सुकेश गुप्ता यांनी कंपनीसोबत वन-टाइम-सेटमलेंट करत कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, या एकूणच या व्यवहारात काळेबेरे असल्याचे दिसून आल्याने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यानंतर ईडीनेदेखील या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि १८ ऑक्टोबर रोजी सुकेश गुप्ता याला अटक केली. त्याच्याशी निगडित पाच ठिकाणी ईडीने गुरुवारी छापेमारी केली आणि त्याची १५० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. सुकेश गुप्ता याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.