लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मनोरंजन क्षेत्राशी निगडित काही बनावट कंपन्यांची निर्मिती करत त्या कंपन्यांसाठी आवश्यक तांत्रिक सामानाची खरेदी करण्यासाठी दुबईत ५३ कोटी ८३ लाख रुपये फिरवणाऱ्या व प्रत्यक्षात अशा कोणत्याही सामानाची खरेदी न करणाऱ्या मुंबईतील भूपेश अगरवाल नावाच्या व्यक्तीवर ईडीने कारवाई केली आहे. मंगळवारी ईडीने त्याच्या व त्याच्या पत्नीच्या नावे असलेले बोरीवली येथील दोन फ्लॅट्स जप्त केले आहेत. त्यांची किंमत दोन कोटी ८३ लाख रुपये इतकी आहे.
परदेशी चलन विनिमय कायद्याचा (फेमा) भंग झाल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, भूपेश अगरवाल याच्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित तीन कंपन्या असून, कंपनीला ऑडिओ-व्हिडिओ तंत्रासाठी उपकरणांची खरेदी करायची असल्याचे सांगत परदेशी बँकेच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून त्याने हे ५३ कोटी रुपये दुबईत पाठवले. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही सामानाची उचल त्याने केली नाही.
तीनही कंपन्या बोगस ईडीच्या सूत्रांनी ज्यावेळी या व्यवहाराची माहिती त्यांना दिली तेव्हा ईडीने याचा तपास सुरू केला असता त्याच्या तीनही कंपन्या बोगस असल्याचे आढळून आले. तसेच, एवढ्या मोठ्या प्रमाणावर परदेशात पाठवलेल्या पैशांवर करदेखील भरला नव्हता. या प्रकरणात फेमा कायद्याचे उल्लंघन आणि अनुषंगिक कर चुकवेगिरी झाल्याच्या मुद्द्यावरून ईडीने ही जप्तीची कारवाई केली आहे.