सांगली : शहरातील शंभर फुटी रस्ता, कर्नाळ रस्ता परिसरात ऑनलाइन पेमेंट सिस्टीमचे साऊंडबॉक्स मोफत देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकांना एकाने ५३ हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी सांगली शहर व सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आल्या आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गेल्या आठवडाभरात हा प्रकार घडला आहे. शहरातील शंभर फुटी रस्ता परिसरात दुकान असलेल्या सरदार ऊर्फ अनिस गुलाब रोहिले (रा. रामनगर, सांगली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकजण त्यांच्या वर्कशॉपमध्ये आला व त्याने ऑनलाइन पेमेंट कंपनीचे साऊंडबॉक्स देण्याचे आमिष दाखविले. यासाठी त्याने रोहिले यांचा मोबाइल घेत त्यावरील ॲपद्वारे २० हजार रुपये आपल्या खात्यावर वळते केले. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
दुसरी फिर्याद सतीश आनंदराव कुकडे (रा. दत्तनगर, सांगली) यांनी दिली असून, त्यांचे इलेक्ट्रॉनिक्स व जनरल स्टोअर्स आहे. त्यांच्याकडेही एकाने येत साऊंडबॉक्स देण्याचे आमिष दाखविले व मोबाईल घेत त्यावरून १५ हजार रुपये स्वत:च्या खात्यावर घेतले. वैभव शशिकांत दरीगोंडा (रा. वसंतनगर, मौजे डिग्रज) यांनीही सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऑनलाईन पेमेंटसाठी साऊंड बॉक्स देतो असे सांगून त्याने वैभव यांच्याकडील मोबाईल मागून घेतला व त्यावरून १३ हजार काढून घेतले, तर अन्य एकाच्या मोबाईलवरून पाच हजार रूपये काढून घेत फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सायबरकडून संशयित जेरबंदऑनलाईन पेमेंटसाठी साऊंड बाॅक्स देण्याच्या आमिषाने व्यवसायिकांना गंडा घालणाऱ्या संशयितास सायबर पोलिसांनी जेरबंद केले. अतिक ईलाई मुल्ला (वय २२, रा. भारत बेकरीजवळ, खणभाग,सांगली) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून मोबाईल व रोकड असा ५० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. अशाचप्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.