मुंबई - ५७ वर्षीय महिलेला ७४ लाखांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या नायजेरियन जोडप्यासह स्थानिकास सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फेसबुकवर मैत्री झालेल्या इसमाने अमेरिकेन नागरिक असल्याची बतावणी करून महिलेला वेगवेगळी आमिषं दाखवून ७४ लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. गुन्हे शाखा व सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात यातील आरोपी नायजेरियन दांपत्याने नवी मुंबईतील रिक्षाचालकाचा वापर केल्याचे उघड झाले आहे. नायजेरियन दांपत्यासह रिक्षाचालकाला पोलिसांनी नवी मुंबई नाव्हाशेवा येथून अटक केली आहे.
आमरा ओबेसोग्यू (३२) त्याची पत्नी ख्रिस्ताबेल लिबेह (३०) या नायजेरियन दांपत्यासह रिक्षाचालक अशोक बोराडे (४०) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार ५७ वर्षीय महिलेचे फेसबुक मॅसेंजरच्या माध्यमातून डिसेंबर २०१७ मध्ये यातील डॉनल्ड डॉट नावाच्या इसमाची ओळख झाली. त्याने अमेरिकन नागरिक असून इंजिनीयर म्हणून काम करीत असल्याचे तक्रारदार महिलेला सांगितले. होते. ई मेल, फेसबुक व्हॉटस अॅप आदी सोशल मिडियाद्वारे यातील महिलेच्या संपर्कात राहून आरोपीने तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने त्यांच्या जहाजातील सोने, चांदी व रोख रक्कम असलेले पार्सल भारतीय कस्टमकडून सोडविण्याकरीता दिलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवले व अमेरिकेला जाण्याकरिता २० हजार पाउण्ड देण्याच्या आमिषाबरोबरच अनेक आमिषे दाखवून महिलेकडून विविध बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. त्याच्या आमिषाला बळी पडून यातील महिलेने एकूण ७४ लाख २०,१५० रुपये आरोपींच्या बँक खात्यात भरले. मात्र त्यानंतर आरोपींनी महिलेशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर यातील महिलेने विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट ६ व ८ च्या पोलिासांनी सायबर सेलच्या पोलिसांच्या सहकार्याने सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना महिलेने आरोपीला ज्या ३० वेगवेगळ्या बँक खात्यांमार्फत पैसे दिले त्या बँक खात्यांचा अभ्यास केला. मिझोराम, हैदराबाद , दिल्ली या राज्यांत खातेदारांचा तपास केला असता असे उघड झाले की, ही बँक खाती फसवणूक करण्यासाठीच उघडली होती. त्या बँक खात्यातून वळती करण्यात आलेली रक्कम, तसेच इतर तांत्रिक दुवे यांच्या तपासानंतर नवी मुंबई, नाव्हाशेवा उलवे येथील रिक्षाचालक, टॅक्सीचालक हे नायजेरिन नागरिकांच्या संपर्कात राहून असे फसवणुकीचे गुन्हे करीत आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी व्हावा शेवातील उलवे येथील रिक्षाचालक अशोक बोराडे याला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत नायजेरियन दांपत्यासह मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार याप्रकरणी नायजेरिन दांपत्याला उलवे येथून शुक्रवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १३ मोबाईल, राऊटर, मोडेम, डेटा कार्ड, लॅपटॉप जप्त करण्यात आला असून या दांपत्याने अशा प्रकारे पुणे येथेदेखील अशा प्रकारचा गुन्हा केल्याचे उघड झाले आहे.