मुंबई - लॉकडाऊनच्या काळात ‘लॉक’ झालेली रस्त्यावरील गुन्हेगारी पुन्हा ‘अनलॉक’ झाल्याने पोलिसांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. यातच, गेल्या दोन महिन्यांत मुंबईतून ५७३ वाहने चोरीला गेली आहेत. यातील अवघ्या १५३ वाहनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या २ महिन्यांत मुंबईत एकूण ६ हजार १६८ गुन्हे नोंद झाले. यापैकी ३ हजार ४८० गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. गेल्या वर्षी हाच आकडा ७ हजार १५५ होता. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या मुख्यत्वेकरून एप्रिल आणि मे महिन्यात शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात घट झाली. मात्र जून महिन्यात अनलॉकचा टप्पा सुरू होताच गुह्यांचे प्रमाण पुन्हा जैसे थे झाले आहे. गेल्या २ महिन्यांत वाहन चोरीचे २ हजार ५१७ गुन्हे पोलीस दफ्तरी नोंद झाले आहेत. पाेलिसांनी त्यांचा तपास हाती घेतला असला तरी आतापर्यंत यापैकी अवघ्या ९०० वाहनांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात, १२५ ने वाढ झाली आहे. दिवसाला ८ ते ९ वाहने चोरीला जात असल्याने मुंबईकरांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.
भंगारात पार्टची विक्री... तर कुठे बनावट क्रमांकाच्या आधारे विक्रीnरस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकी चोरून काही टोळ्या त्यांच्या पार्ट्सची मुंबईसह मुंबईबाहेर विक्री करतात. मुंबईतही बऱ्याच गॅरेजमध्ये यांची कमी भावात खरेदी करतात. तर काही जण त्यांना भंगारातील दुचाकींचे इंजीन नंबर लावत त्यांची विक्री करतात. nभंगारामध्ये निघणाऱ्या दुचाकी दोन ते पाच हजारांमध्ये कागदपत्रांसह ग्राहकांकडून खरेदी करायच्या, त्यानंतर त्याच बनावटीची दुचाकी शोधून ती दुचाकी चोरायची आणि त्या नंबरचा वापर करून ती तिसऱ्याला विकायची. अशा टोळ्यांवर मुंबई पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे.