मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिगप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये चौकशीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांचे पुत्र ऋषिकेश यांना ईडी आणखी एकदा समन्स बजावण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त होते. आता, देशमुख यांना नव्याने नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार, देशमुख यांना ईडीने बुधवारी चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीने केवळ अनिल देशमुख यांनाच हे समन्स बजावल्याचे समजते.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून आणखी एक नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार, अंमलबजावणी संचालनालयाने अनिल देशमुख यांना बुधवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे बजावले आहे. देशमुख यांना ईडीने बजावलेली आत्तापर्यंतची ही 5 वी नोटीस आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी देशमुख यांच्या नागपुरातील मालमत्तेवर छापे टाकून झडती घेतली आहे. त्यानुषंगाने नव्याने समन्स पाठवले जाणार असल्याची माहिती होती. आता, देशमुख यांना ईडीने 5 व्यांदा समन्स बजावले आहे.
महिन्याला शंभर कोटी वसुलीच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपाप्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून ईडीचा देशमुखांसह कुटुंबीयांच्या मागे ससेमिरा सुरू आहे. त्यांना आतापर्यंत ४ वेळा, तर मुलगा ऋषिकेश व पत्नी आरती देशमुख यांना अनुक्रमे दोन व एकवेळा चौकशीसाठी समन्स बजाविले आहे. मात्र, तिघांनीही उपस्थित राहण्याचे टाळले आहे.
देशमुख यांना फरार घोषित करा - किरीट सोमैय्या
अनिल देशमुख यांना मनी लॉंड्रिंग तसेच १०० कोटींच्या वसुली प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) अनेकदा नोटीस बजावली. मात्र, असे असतानाही देशमुख काही कारणे देत प्रत्यक्ष चौकशीला हजर राहत नव्हते. तसेच, या पार्श्वभूमीवर ईडीने कारवाई करू नये, म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र, त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यानंतर, अनिल देशमुखांविरोधात अजामिनपात्र वॉरंट इश्यू करण्यात यावे. तसेच त्यांना फरार घोषित करण्यात यावे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी इडीकडे केली आहे.