मुंबई - अमली पदार्थ तस्कर असल्याच्या संशयावरून हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) विमानतळावर बेड्या ठोकलेल्या व्हेनेझुएलाच्या नागरिकाने चक्क कोकेनच्या ६० कॅप्सूल गिळल्याचे एक्सरे तपासणीतून उघड झाले होते. त्यानंतर जे. जे. रुग्णालयात सहा दिवसांत त्याच्या पोटातून ६० कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या आहेत. या प्रकरणात ब्राझीलमधील नायजेरियन तस्कराचा हात असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यानंतर व्हेनेझुएलन नागरिकाला अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.डेमनाईस मिगुईल टोवर सेल्स (२७) असं या दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलन तस्कराचं नाव आहे. याच्या पोटातून कोकेनच्या ६० कॅप्सूल काढण्यात आल्या. त्याला एआययूच्या पथकाने १९ जुलैला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याच्याजवळील सर्व बॅगा आणि इतर साहित्याच्या तपासणीत काहीच सापडले नव्हते. मात्र, एक्सरे तपासणीत त्याच्या पोटात कॅप्सूल असल्याचे आढळून आले. नंतर त्याला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी एनिमा देऊन या तस्कराच्या पोटातून सर्व कॅप्सूल बाहेर काढल्या. त्यासाठी डॉक्टरांना सहा दिवस उपचार करावे लागले.जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी पहिल्यांदा २१ जुलैला सेल्सच्या पोटातून १४ कॅप्सूल बाहेर काढल्या. त्यानंतर सहा दिवसांत थोड्या-थोड्या अशा ६० कॅप्सूल काढण्यात आल्या. या कॅप्सूलमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आढळून आली होती. त्याच्या पोटातील कॅप्सूलमधून मिळालेल्या सुमारे ६५० ग्रॅम कोकेनची किंमत दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या व्हेनेझुएलन नागरिकाने इंग्रजी भाषा येत नसल्याचा दावा केल्यामुळे चौकशीसाठी ती भाषा येत असलेल्या व्यक्तीची मदत घेण्यात येत आहे. हे कोकेन तो मुंबईत कोणाला देणार होता याचा तपास सुरू आहे. चौकशीत या तस्करीचे धागेदोरे ब्राझीलपर्यंत पोहोचले आहेत. तेथील पॅट्रिक या नायजेरियन तस्कराने हे अमली पदार्थ दिल्याचे त्याने सांगितले. या तस्करीसाठी त्याला ३ हजार अमेरिकन डॉलर मिळणार होते. मात्र, त्यापूर्वीच तो पकडला गेला. डॉक्टरांनी प्रकृती ठीक असल्याचे सांगितल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मुंबई विमानतळावरून १० दिवसांपूर्वी एका परदेशी महिलेलाही कोकेन तस्करीप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली होती. तिच्या देखील पोटात २४ कोटी रुपयांच्या कोकेनच्या कॅप्सूल सापडल्या होत्या.
अबब... पोटातून निघाल्या कोकेनने भरलेल्या ६० कॅप्सूल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 5:59 PM
मुंबई विमानतळावरून व्हेनेझुएलाच्या तस्कराला अटक
ठळक मुद्देया प्रकरणात ब्राझीलमधील नायजेरियन तस्कराचा हात असल्याची माहिती उघड झाली आहे. मुंबई विमानतळावरून १० दिवसांपूर्वी एका परदेशी महिलेलाही कोकेन तस्करीप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली होती.डेमनाईस मिगुईल टोवर सेल्स (२७) असं या दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलन तस्कराचं नाव आहे.