कडा : गहू खरेदीच्या करारात वर्षभरात वेळोवेळी ६० लाखाची रक्कम देऊनही तालुक्यातील एका व्यापाऱ्याची दोन दलाल व इंदूर येथील व्यापाऱ्याने फसवणूक केली. याप्रकरणी कोर्टाच्या आदेशाने पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी येथील व्यापारी ईश्वर शिंगटे यांनी कडा येथील विठ्ठल सोनवणे व गोरेगाव येथील तेजन मुन्शी या दलालांमार्फत इंदूर येथील व्यापारी विजय यादव यांच्यासोबत २० नोव्हेंबरला गहू खरेदीचा करार केला. करारापोटी शिंगटे यांनी वर्षभरात वेळोवेळी चेक व आरटीईजीएसच्या माध्यमातून ६० लाख रुपये दिले. यासोबतच दोन्ही दलालांना देखील त्यांचे कमिशन देण्यात आले. दरम्यान, शिंगटे यांना वर्षभरात गहू मिळाला नाही. गव्हाची मागणी केली असता, 'माल शिल्लक नाही, नंतर माल पाठवतो' अशी कारणे शिंगटे यांना देण्यात आले.
कोर्टाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश
यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शिंगटे यांनी पोलिसात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. यामुळे शिंगटे यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे कैफियत मांडली. त्यांनी सुद्धा दखल न घेतल्याने शिंगटे कोर्टात गेले. यानंतर कोर्टाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यानुसार गुरुवारी रात्री दलाल विठ्ठल सोनवणे व तेजन मुन्शी आणि व्यापारी विजय यादव यांच्या विरोधात आष्टी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भारत मोरे करीत आहेत.
सदर गुन्ह्याची सत्यता पडताळून चौकशी करू. आरोपींचा हस्तक्षेप सपष्ट झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल - सहायक पोलीस निरीक्षक, भारत मोरे आष्टी पोलीस ठाणे