लोकमत न्यूज नेटवर्क
कमलाकर कांबळे/नवी मुंबई: शहरात सध्या हेवी डिपॉझिटवर भाडेतत्त्वावर घर घेण्याचा ट्रेंड वाढला आहे. या प्रक्रियेत केवळ डिपॉझिटची रक्कम द्यायची असते. निर्धारित कालावधीनंतर ही संपूर्ण रक्कम परत मिळते. मात्र त्या आडून गरजू भाडेकरूंची फसवणूक करणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे. एका चौकडीने हेवी डिपॉझिटवर घर देण्याच्या बहाण्याने सहा गरजू भाडेकरूंना तब्बल साठ लाख रुपयांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
विशेष म्हणजे यासंदर्भात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना साकडे घातल्याचे फसविले गेलेल्यांनी शनिवारी सांगितले. वाशी सेक्टर १५ येथील एकच घर सहा वेगवेगळ्या लोकांना दाखवून हेवी डिपॉझिटच्या नावाखाली मागील चार वर्षात सुमारे ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सपना बाबूशंकर पाल, सुदालाल कोणार, मूथू लक्षमी, चाँद मोहम्मद मोमीन व रजिया चाँद मोमीन, साजरा इक्राम खाखरा आणि अफरोज इन्तेखाब खान अशी फसवणूक झालेल्यांची नावे आहेत.
मासिक घरभाडे वाचविण्यासाठी त्यांनी आपल्याकडील सर्व जमा रक्कम हेवी डिपॉझिटच्या घरासाठी दिली आहे. यासंदर्भात संबंधितांनी त्यावेळी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार केली. परंतु कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी आता थेट पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांना साकडे घातले आहे.