मीरा रोड - मीरारोडमध्ये एकट्या राहणाऱ्या रीटा रॉड्रीग्ज (वय ६०) या ज्येष्ठ नागरिक महिलेच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. संजय उर्फ सोनू वर्मा (वय ३४) या आरोपीला अटक करण्यात आली त्याचे हत्येमागील कारण ऐकून पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत. रीटा यांनी दोन दिवसांसाठी गाडी चालवायला देण्यास नकार दिल्याने खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
ठाणे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने संजय उर्फ सोनू वर्मा या आरोपीला कानपूरमधून अटक केली आहे. संजय वर्मा हा रेल्वेच्या गाड्यांचं दुरुस्ती काम करणारा खासगी कंत्राटदार आहे. रीटा यांच्या मालकीच्या कारची तो सतत मागणी करत होता. दोन दिवस आपल्याला गाडी पाहिजे आहे असं म्हणत त्याने रीटा यांच्यामागे चावी देण्यासाठी तगादा लावला होता. मात्र रीटा यांनी त्याला गाडीची चावी देण्यास सातत्याने नकार दिला होता. यामुळे संतापलेल्या संजय वर्माने ४ तारखेला दिवाळीची मिठाई देण्याच्या बहाण्याने रीटा यांच्या घरात प्रवेश केला आणि चाकून भोसकून त्यांचा खून केला. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासलं होतं. या दृश्यांमध्ये संजय वर्मा हा संशयास्पद अवस्थेत रीटा यांच्या इमारतीबाहेर असल्याचं दिसलं होतं. हत्या केल्यानंतर संजय हा कानपूरला पळून गेला होता. ठाणे पोलिसांनी त्याला कानपूरहून अटक केली. चौकशीदरम्यान त्याने खुनाची कबुली दिली.
धक्कादायक! एकट्या राहणाऱ्या वृद्धेची धारदार शस्त्राने अनेक वार करून निर्घृण हत्या