धुळे : गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढत असणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोनपोत शिताफीने लांबविण्यात आली. ही घटना धुळे बस स्थानकात १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे वृद्ध महिला घाबरून गेली होती. स्वत:ला सावरून तिने शहर पोलिस स्टेशन गाठत फिर्याद दिली. त्यानुसार, शुक्रवारी चोरीचा गुन्हा दाखल झाला.
चाळीसगाव तालुक्यातील वडाळी येथील शकुंतला सुरेश पाटील (वय ६५) या वृद्ध महिलेने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मुलगी रेवती हिची सासू मंगला दिलीपराव शिंदे या धुळ्यातील बस स्थानकात आल्या. त्यांना धुळे तालुक्यातील कुसुंबा गावी जायचे हाेते. त्या गाडीची वाट पाहत असताना जळगाव - नवापूर ही बस दाखल झाली. त्या बसमध्ये चढणाऱ्यांची गर्दी होती. तरीदेखील या दोन्ही महिला बसमध्ये चढल्या. त्याच वेळेस चोरट्याने संधी साधली आणि १८ ग्रॅम वजनाची ६० हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत शिताफीने लांबविली.
चोरीची ही घटना १७ ऑक्टोबर रोजी साायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. गळ्यातून सोनपोत लंपास झाल्याची बाब सुरुवातीला महिलेच्या लक्षात आली नाही. ज्यावेळेस लक्षात आली त्यावेळेस वृद्ध महिला घाबरून गेली. स्वत:ला सावरत तिने शहर पोलिस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शुक्रवारी सायंकाळी पावणे सहा वाजता भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक डी. पी. बैसाणे करीत आहेत.