कोरेगाव भीमा : कोविड विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशाची शिक्रापूर पोलीस व परिसरातील ग्रामपंचायतींनी अंमलबजावणी सुरु केली असून त्यानुसार शिक्रापुर पोलीस स्टेशन अंतर्गत शिक्रापुर , तळेगाव ढमढेरे , सणसवाडीसह पाबळ येथील १३० लोकांवर मास्क न वापल्याबद्दल प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे ६५ हजार रुपये दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांतील ग्रामपंचायत प्रशासनाला पोलिसांनी मास्क न लावता फिरणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची मदत देत असल्याचे सांगत कारवाईस सुरवात करण्यास सांगितले आहे, त्यानुसार आज शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, किरण भालेकर, पोलीस हवालदार संजय ढावरे तसेच सणसवाडीचे ग्रामविकास अधिकारी बाळनाथ पवणे, पोलीस पाटील दत्तात्रय माने, क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर दरेकर यांसह आदींनी सणसवाडी व परिसरात तोंडावर मास्क न लावणाऱ्या , रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे, यावेळी कारवाई करण्यात येणा-या सर्व व्यक्तींवर प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारण्यात आला आहे, तर प्रशासनाने सुरु केलेल्या या कारवाईची नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे, तर यावेळी बोलताना दररोज अशा प्रकारच्या कारवाया सुरु राहणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर व ग्रामविकास अधिकारी बाळनाथ पवणे यांनी सांगितले.
.....................
परिसरातील ग्रामपंचायतींनी कारवाईसाठी पुढे यावे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई करत गोळा होणारा दंड हा गावातील सार्वजनिक कामांसाठी वापरू शकता, कारवाई सुरु असलेल्या सर्व ठिकाणी पोलिसांची मदत देणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने सदर कारवाई साठी पुढे येथे गरजेचे असल्याचे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.
..................
एका दिवसात ६५ हजार वसुल कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकानी तसेच कामाच्या ठिकाणी , प्रवासात असताना चेहऱ्यावर मास्क न लावणे यासह पान , तंबाखू , गुटखा खाऊन थूंकणे , किंवा गुटका न खाताही थूंकणे यासह आज शिक्रापुर पोलीसांनी चार गावांमध्ये १३० लोकांवर कारवाई केली असुन त्यांच्याकडुन ६५ हजारांची दंडात्मक रक्कम गोळा करण्यात आली आहे.