कल्याण - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रशासकीय यंत्रणा आपली जय्यत तयारी करीत असताना पोलीस प्रशासनानेही कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त कल्याण परिमंडळ तीनमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली असून मुंबई-ठाण्यात शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी अवघ्या काही दिवसांचाच कालावधी राहिला आहे. लोकसभा निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी पोलिसांकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे उपायुक्त पानसरे यांनी सांगितले.
कल्याण परिमंडळात करण्यात आलेल्या या प्रतिबंधात्मक कारवाईत ६ फरार तर ६० पाहिजे असणारे आरोपी पकडण्यात आले आहेत. तसेच २ गावठी कट्टे, ६ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले असून २५ जणांना हद्दपार तर ३४ जणांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कल्याण परिमंडळात असणाऱ्या एक हजार २७० परवानाधारक शस्त्रांपैकी एक हजार १४० शस्त्र जमा करण्यात आली असून उर्वरित शस्त्र ही बँका आणि इतर संस्थांकडे असल्याचे ही त्यांनी सांगितले. तर याशिवाय एक हजारांच्या आसपास व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत.