ठाणे: शेअर मार्केटमध्ये जादा नफा मिळवून देण्याच्या अमिषाने जयदीप राठोड यांची ६६ लाखांची आॅनलाईन फसवणूक झाली होती. यातील २५ लाखांची रक्कम परत मिळवून देण्यात यश आल्याची माहिती नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांनी रविवारी दिली. आपली काही अंशी रक्कम परत मिळाल्याने राठोड यांनी समाधान व्यक्त केले आहे. यातील आराेपीचा शाेध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.
ठाण्याच्या नौपाडा भागातील रहिवाशी जयदीप राठोड यांना काही दिवसांपूर्वी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगून जादा नफा देण्याचे अमिष एका सायबर भामटयाने दाखविले होते. हे सांगतांना त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ६६ लाखांची रक्कम परस्पर काढण्यात आली होती. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर राठोड यांनी याप्रकरणी तातडीने नौपाडा पोलिस ठाण्यात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता. याचीच दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापसिंह शेळके यांच्या पथकाने राठोड यांच्या बँक खात्यातून परस्पर काढलेली रक्कम ज्या बँक खात्यात गेली होती.
त्या बँकांना पत्र व्यवहार करून संबंधित बँक खाते तातडीने गोठविण्यात आली होती. दरम्यान, पैसे काढणारे बँक खाते गोठविल्याने ६६ लाखांपैकी २५ लाखांची रक्कम १० जुलै २०२४ रोजी परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आहे. अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी तातडीने जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नौपाडा विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त प्रिया ढाकणे यांनी केले आहे.