लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मलेशिया येथून मुंबई विमानतळावर आलेल्या दुर्मीळ प्रजातीच्या साप, सरडे, कासव, घोणस अशा एकूण ६६५ प्राण्यांच्या तस्करीचे रॅकेट केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी उद्ध्वस्त केले आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबत ही संयुक्त कारवाई केली. याप्रकरणी मुंबईतील दोघांना अटक करण्यात आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मुंबई विमानतळाच्या कार्गो कॉम्प्लेक्स येथे मलेशिया येथून एक पार्सल आले होते. याद्वारे काही तस्करी होत असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी या पार्सलची तपासणी केली असता यामध्ये या दुर्मीळ प्रजातीचे प्राणी आढळून आले. हे पार्सल उघडल्यानंतर ६६५ प्राण्यांपैकी ५४८ जिंवत आढळून आले, तर उर्वरित मृतावस्थेत आढळले. या प्राण्यांची किंमत २ कोटी ९८ लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी धारावी येथील रहिवासी असलेल्या राजा आणि माझगाव येथील रहिवासी असलेल्या व्हिक्टर लोबो या दोघांना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेले हे दुर्मीळ प्राणी वनखात्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत.