मुंबई : एका नामांकित बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरने वृद्ध खातेधारक महिलेच्या खात्यातून जवळपास ६७ लाख २० हजार ३३३ रुपयांची रक्कम लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी वृद्धेच्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या मुलाने वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून, आम्ही अधिक तपास करत आहोत, असे वांद्रे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मराठे यांनी सांगितले.
पोलिसांना तिच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार व त्यांचे भाऊ परदेशात राहत असून, त्यांची आई ८० वर्षांची आहे. ती वांद्रे पश्चिमच्या पाली रोड येथे राहते. वयोवृद्ध असल्याने आईला बँकेच्या संलग्न शाखांमध्ये येणे - जाणे शक्य नव्हते. त्यामुळे बँकेकडे मदतनीस देण्याची मागणी केली होती. तेव्हा बँकेने रेश्मा मंडल नामक महिलेची १९ ऑक्टोबर २०१९ रोजी रिलेशनशिप मॅनेजर म्हणून निवड केली. मंडल ही घरखर्चासाठी तसेच मोलकरणीला पगार देण्यासाठी वृद्धेच्या बँक खात्यातून पैसे काढून त्यांना आणून द्यायची. या दरम्यान एप्रिल २०२३ मध्ये वृद्ध महिला आजारी पडल्याने त्यांना होली फॅमिली रुग्णालयात दाखल केले.
तेव्हा रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने तिच्या मुलाने तिच्या खात्यावर एक रक्कम पाठवली. त्यावेळी त्याला खात्यामधील ही उलाढाल पाहून मोठी रक्कम लंपास केली गेली असल्याचे लक्षात आले. त्यांनी त्यांच्या आईकडे विचारणा केली. मात्र, त्यांना या व्यवहाराबाबत काहीच कल्पना नव्हती. कारण सगळे व्यवहार मंडल करत असल्याचे ती म्हणाली. तेव्हा मंडलकडे चौकशी करण्यात आली आणि तिने ते पैसे घेतल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी मंडलच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
...अशी फिरवाफिरवी वृद्धेच्या मुलाला खात्यामधील व्यवहार पाहिल्यानंतर लक्षात आले की, १७ जानेवारी २०२२ ते ६ मार्च २०२३ पर्यंत आईच्या चार खात्यांतून ४३ लाख ९९ हजार ७०१ रुपये काढले गेले, तर एका क्रेडिट कार्डातून २१ फेब्रुवारी २०२२ ते ४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत १७ लाख १४ हजार ६३२ रुपये एका खात्यावर वळते केले. तसेच ६ लाख ६ हजार एटीएममधून काढून घेतल्याचेही त्यांना आढळले.