मुंबई - कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र आणि बांधकाम व्यावसायिक उन्मेष जोशी यांची ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) ७ तास चौकशी केली. झालेली चौकशी समाधानकारक झाल्याचा दावा उन्मेष जोशींनी केला असून ईडी पुन्हा चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. याप्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील लवकरच चौकशीला सामोरं जाण्याची शक्यता आहे. कोहिनूर प्रकरणी ईडीकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बांधकाम व्यावसायिक उन्मेष जोशी यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार उन्मेष हे आज दुपारी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. मला नोटीस मिळाली असून ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आलो आहे. मला ईडीकडून कोणतेही प्रश्न पाठण्यात आलेले नाहीत. मी त्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे जोशी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. ईडीच्या कार्यालयात पोचल्यानंतर जोशी यांची ७ तास चौकशी करण्यात आली. सायंकाळी ७ वाजताच ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर आले.
नेमकं काय प्रकरण ?
उन्मेष जोशींनी काही सहकाऱ्यांच्या पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू केला होता. त्यात इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अँड एफएस) या सरकारी क्षेत्रातील कंपनीने २२५ कोटींची गुंतवणूक केली होती. कालांतराने जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ९० कोटीला कंपनीचे समभाग विकले होते. त्यानंतर देखील कंपनीला अगाऊ कर्ज देण्यात आलं होतं. या कर्जाचा परतावा करण्यात आला नव्हता. त्यामुळे कोहिनूर सिटी एनएलने २०११मध्ये काही मालमत्ता विकून ५०० कोटींचा परतावा करण्याच्या करारावर सही केली होती. त्यामुळे आयएल अँड एफएसकडून कोहिनूरला पुन्हा १३५ कोटींचं कर्ज देण्यात आलं होतं. या प्रकरणात अनियमितता आढळून आल्याने ईडीने त्याची चौकशी सुरू केली आहे.
उन्मेष जोशी यांना विचारण्यात आलेले प्रश्न
कोहिनुर सिटीएनएल ही कंपनी कधी आणि कशी स्थापन करण्यात आली ?
या कंपनीत किती पार्टनर होते ?
कंपनीचे क्लाइंट कोण कोण आहेत ?
त्यांचा व्यवसाय काय होता ?
कंपनीने कोणा कोणाकडून कर्ज घेतले होते ?
आता पर्यंत कोणाचे किती कर्ज फेडले ?
अचानक 2008 मध्ये नुकसान कसे झाले ?