जळगाव : किड्स गुरुकुल स्कूलच्या प्राचार्या मीनल संतोष जैन यांच्या दौलत नगरातील बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी साडे पाच लाख रुपये किमतीचे १३ तोळे सोन्याचे दागिने, दीड लाख रुपये रोख व काही नकली दागिने असा सात लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
मोहाडी रोड व संभाजी नगराच्या मध्यभागी असलेल्या दौलत नगरातील मुख्य रस्त्यावरच प्लॉट क्र.२६ मध्ये मीनल जैन या वास्तव्याला आहेत. गेल्या महिनाभरापासून त्या आई प्रेमलता, वडील संतोष जैन, भाऊ नितीन जैन व वहिणी कृती जैन यांच्यासह किडस् गुरुकूल स्कूलमध्येच वास्तव्याला होते. अधूनमधून त्यांचे घरी येणे-जाणे होते. तीन दिवसापूर्वीच घरी येऊन परत शाळेत गेल्या होत्या. मंगळवारी सकाळी शेजारी राहणारे गजानन चावदस मराठे यांनी मोबाईलवर संपर्क घरुन घराचे कुलुप व कडी कोंयडा तुटल्याची माहिती जैन यांना दिली. त्यानुसार त्यांनी सकाळी घरी येऊन पाहिले असता घरात चोरट्यांनी हात साफ केल्याचे दिसून आले.
बक्षीसाच्या वस्तू, कागदपत्रेही गायब
मीनल जैन घरी आल्या तेव्हा मुख्य दरवाजा आतून बंद होता. मागील किचनकडील दरवाजा मात्र उघडा होता. तेथून प्रवेश केला असता घरातील प्रत्येक खोलीतील साहित्य अस्ताव्यस्त होते. कपाट, बेडमधील साहित्य काढलेले होते. कपाटात व बेडमध्ये ठेवलेले दागिने, रोेख रक्कम, नकली दागिने, शाळेचे महत्वाचे कागदपत्रे, मालमत्तेचे कागदपत्रे त्याशिवाय बक्षीस म्हणून मिळालेल्या महागड्या वस्तू चोरट्यांनी लांबविल्याचे दिसून आले.
भींतीवरुन उडी घेऊन प्रवेश
चोरट्यांनी घरात प्रवेश करताना वॉलकंपाऊडच्या भींतीवरुन उडी घेतली.मुख्य दरवाजाचे कुलुप व कडी कोंयडा तोडला. नंतर घर पिंजून रोकड व दागिन्यांवर हात साफ केला. जाताना मुख्य दरवाजाची आतून कडी बंद करुन किचनच्या जवळील दरवाजातून बाहेर निघाले. किचनमध्ये खाद्य पदार्थही त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
श्वान पथकाकडून माग शोधण्याचा प्रयत्न
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल बडगुजर, सहायक फौजदार गोपाळ चौधरी, हवालदार अनिल फेगडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे विजयसिंग पाटील, राजेश मेढे, संजय हिवरकर, विजय काळे व सहकाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते,मात्र त्यांच्याकडून माग शोधण्याचा प्रयत्न केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅॅमेरेही पोलिसांकडून शोधले जात होते. दरम्यान, मीनल जैन यांच्या सहकाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना धीर दिला.