मुंबई : दुकान फोडून १४९ मोबाइलची चोरी सोमवारी करण्यात आली होती. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे. त्याच्याकडून जवळपास ७ लाखांचे मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. त्याच्या फरार साथीदाराची ओळख पटली आहे. त्याचा शोध सुरू आहे.कांदिवलीच्या वडारपाडामध्ये असलेल्या एका मोबाइलच्या दुकानाचे शटर फोडून त्यातून १८ लाख ६४ हजार ४९८ रुपये किमतीचे मोबाइल दोन व्यक्तींनी पळवून नेले. ७ डिसेंबर, २०२० रोजी याची तक्रार समतानगर पोलिसांकडे दाखल करण्यात आली. परिमंडळ १२चे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने आसपासचे सीसीटीव्ही फुटेज पडताळले. याप्रकरणी अमजद अली शेख (४६) या रिक्षाचालकाला उत्तर प्रदेशमध्ये जाऊन ताब्यात घेतले. तर त्याचा भाऊ जाकीर अली शेख पसार आहे. त्याच्या विरोधात साकीनाका, तुळिंज व नालासोपारा पोलिसात गुन्हा दाखल आहे. या दोघांनी मिळून मोबाइलच्या दुकानात डल्ला मारल्याचे उघड झाले असून अद्याप ७ लाख रुपये किमतीचे मोबाइल हस्तगत करण्यात आल्याचे कसबे यांनी सांगितले. या दोघांनी अशा प्रकारे अजून काही ठिकाणी चोरी केल्याचा संशय असून पोलीस चौकशी करत आहेत.
दुकानातून चोरीला गेलेले ७ लाखांचे मोबाइल हस्तगत, एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 4:05 AM