नवी दिल्ली - दिवाळी सणाचा उत्साह आणि आनंद देशभरात ओसंडून वाहताना दिसत आहे. मात्र, या सणाला वेळ न पाळता फटाके फोडल्याने गालबोट लागले आहे. तामिळनाडूमध्येसर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून घालून दिलेली वेळ न पाळता फटाके फोडल्याने २०० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ७ जणांना अटक करण्यात आली.
मंगळवारी सायंकाळी ६ वाजता फटाके फोडताना आढळून आल्याने तामिळनाडू पोलिसांनी कडक पावलं उचलत हे गुन्हे दाखल केले आहेत. कारण तामिळनाडू सरकारने सकाळी ६ ते ७ आणि सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत फटाके फोडण्यासाठी वेळेचे बंधन घालून दिले आहे. मात्र तरी देखील वेळेबाहेर फटाके फोडल्याने पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तामिळनाडू राज्यात सर्वात जास्त गुन्हे हे विल्लूपुरम जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या जिल्ह्यात ८० लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वीरूधुनगर पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४० लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तर कोईम्बतूर येथे ३० आणि दिंडीगुलमध्ये २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमक्कल पोलिसांनी एकाला अटक केली असून तिरुनेलवेली पोलिसांनी ६ जणांना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बेड्या ठोकल्या. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून या सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.