अलवर - राजस्थानच्या भिवाडी इथं एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे ज्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. भिवाडीमध्ये तैनात पोलीस कर्मचाऱ्यांनीच त्यांच्या जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांचं लोकेशन ट्रॅक करत त्यांच्या हालचालींवर नजर ठेवून होते. १५ हून अधिक वेळा जिल्हा पोलीस अधीक्षकांचं लोकेशन तपासलं गेले. त्यांच्या मोबाईलवर नजर ठेवली गेली. हा प्रकार उघडकीस येताच पोलीस दलात खळबळ उडाली. या घटनेनंतर आता भिवाडीत तैनात असलेल्या ७ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
पोलीस विभागातील सायबर सेलमधील अधिकारी आणि कर्मचारी भिवाडी एसपी ज्येष्ठा मैत्रेयी यांचं फोन लोकेशन ट्रेस करत त्या कुठे जातात, काय करतायेत यावर नजर ठेवून होत्या. हा प्रकार कळताच पोलीस अधीक्षक ज्येष्ठा मैत्रेयी यांनी सायबर सेलच्या पोलीस उपनिरिक्षकांसह ५ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. या संपूर्ण प्रकाराची माहिती एसपी ज्येष्ठा मैत्रेयी यांनी पोलीस मुख्यालयाला दिली. या प्रकरणी जयपूर विभागीय पोलीस महासंचालक अजय पाला लांबा यांनी सांगितले की, या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. आतापर्यंत ७ पोलीस कर्मचाऱ्यांचे यात निलंबन केले आहे. या कर्मचाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांवर बेकायदेशीरपणे पाळत ठेवली होती असं त्यांनी सांगितले.
तर मी माझे काम प्रामाणिकपणे करत होती, पण माझ्याच विभागातील लोक माझ्यावर पाळत ठेवत असतील याची मला कल्पना नव्हती. मला याबाबत काहीच माहिती नव्हती, पोलीस कर्मचारी माझे लोकेशन ट्रेस करत होते, मी कुणाला भेटते, कुणाशी बोलते या हालचालींवर लक्ष ठेवत होते. या प्रकाराची मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मी सत्यता तपासली तेव्हा खरेच हे घडतंय ते पुढे आले असं एसपी ज्येष्ठा मैत्रेयी यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात भिवाडी सायबर सेलचे पोलीस उपनिरिक्षक श्रवण जोशी, हेड कॉन्स्टेबल अवनीश कुमार, कॉन्स्टेंबल राहुल, सतीश, दीपक, भीम आणि रोहतास यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय तपास होऊन यात आणखी कोण कोण सहभागी आहे ते शोधलं जात आहे.
कोण आहेत ज्येष्ठा मैत्रेयी?
एसपी ज्येष्ठा मैत्रीयी या मूळच्या मध्य प्रदेशातील गुना येथील रहिवासी आहेत. २०१७ मध्ये यूपीएससी परीक्षेत त्यांनी यश मिळवलं. त्यानंतर २०१८ साली ट्रेनिंग पूर्ण करून राजस्थान कॅडरमध्ये पहिल्यांदा उदयपूरच्या गिरवा सर्कलमध्ये एसपी पदावर रुजू झाल्या. त्यानंतर भीलवाडा येथे एसपी जबाबदारी सांभाळली, त्यानंतर जयपूर क्राइम ब्रान्चमध्ये डीसीपी पदावर त्या कार्यरत होत्या. सिरोही एसपीनंतर त्यांना भिवाडी एसपी म्हणून जबाबदारी देण्यात आली.