मुंबई – घाटकोपर येथे एका जैन मुनींनी मंदिर परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी पहाटे ही माहिती समोर आली. मनोहर लाल मुनी महाराज असं आत्महत्या करणाऱ्यांचे नाव आहे. ते ७१ वर्षाचे होते. बुधवारी रात्री मनोहर लाल मुनी महाराज यांनी मंदिरात गळफास घेतला होता. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले.(Jain Muni Sucide at Ghatkopar)
सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मनोहर लाल मुनी महाराजांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. यात मुनींनी म्हटलंय की, माझ्या स्वप्नात माझे गुरू आले त्यांनी मला सांगितले की या पृथ्वीवरचं तुझं काम संपलंय तू आता परत ये असं सुसाईड नोटमध्ये उल्लेख आहे. या घटनेत अद्याप काही संशयास्पद दिसत नाही. आम्ही सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली.
या घटनेनंतर पोलिसांनी मनोहर लाल मुनी महाराजांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पंतनगर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.