बंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका बॅगेत 72 विदेशी साप आणि 6 कॅपुचिन माकडं सापडली आहेत. अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, विमानतळावरून 55 बॉल अजगर, 17 किंग कोब्रा आणि सहा कॅपुचिन माकडं जप्त करण्यात आली आहेत. रिपोर्टनुसार, अजगर आणि कोब्रा जिवंत होते. तर माकडं मृतावस्थेत आढळली आहे.
बंगळुरू कस्टम्सच्या निवेदनानुसार, बॅग बँकॉकहून बंगळुरू विमानतळावर आली होती. वृत्तानुसार, बुधवारी रात्री 10:30 वाजता बँकॉकहून एअर एशियाच्या फ्लाइटने (फ्लाइट क्रमांक FD 137) सामानातून या प्राण्यांना बंगळुरू विमानतळावर आणण्यात आलं. या घटनेने एकच खळबळ उडाली.
बंगळुरू कस्टम्सने एक प्रेस रिलीज जारी करून म्हटलं आहे की, बँकॉकहून रात्री 10:30 वाजता आलेल्या सामानात एकूण 78 प्राणी होते, ज्यात 55 वेगवेगळ्या रंगाचे बॉल अजगर आणि 17 किंग कोब्रा होते. ते जिवंत सापडले. मात्र, 6 कॅपुचिन माकडं मृतावस्थेत आढळून आली आहेत.
त्यात असे नमूद केले आहे की सर्व 78 प्राणी वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत अनुसूचित प्राणी आहेत आणि CITES अंतर्गत सूचीबद्ध आहेत. सीमाशुल्क कायदा, 1962 च्या कलम 110 अंतर्गत प्राणी जप्त करण्यात आले. जिवंत प्राणी मूळ देशात पाठवण्यात आले असून मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे, असं निवेदनात म्हटलं आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.