पनवेल:लॉकेटो ऑनलाईन डेटिंग सर्व्हिस व स्पीड डेटिंगच्या नावाखाली लोकांची फसवणुक करणाऱ्या टोळीचा खारघर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील आरोपीना कोलकाता येथून अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात खारघर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
१५ सप्टेंबर २०१८ ते २६ जानेवारी २०१९ दरम्यान फिर्यादीला एका महिलेने फोनवर संपर्क साधुन लॉकेटो ऑनलाईन डेटिंग सर्व्हिस व स्पीड डेटिंग कंपनीतुन बोलत असल्याचे सांगत या कंपनीच्या मार्फत डेटिंगसाठी हव्या असलेल्या मुली त्या मुली संबंधित पत्त्यावर पुरविण्यात येतील असे सांगितले.याकरिता फिर्यादीकडून रजिस्ट्रेशन फी, आयडी कार्ड फी, ऑग्रिमेंट फी, आयडी कार्ड फी, कॅन्सलेशन आदीसाठी रक्कम भरण्यास सांगितली.
फिर्यादीने आरोपीच्या सांगण्यावरून पैसे भरून देखील त्यांना सर्व्हिस मिळाली नाही. त्यानंतर फिर्यादीने पैसे भरण्यास नकार दिल्याने फिर्यादीला वेगवेगळ्या मार्गातून धमकाविण्यास आरोपींची सुरुवात केली. यामध्ये खोट्या नोटीस पाठविणे, क्राईम ब्रांच च्या नावाने खोटे फोन धमकाविणे आदी प्रकारातून फिर्यादी कडून तब्बल ७३ लाख ५१ हजार ८८२ हि रक्कम विविध राष्ट्रीयकृत बँकेत भरण्यास भाग पाडून फसवणूक केली.यासंदर्भात खारघर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व त्यांच्या पथकाने तिघा आरोपीना कलकत्त्यावरून अटक केली आहे.
रवी दास (२५),प्रबीर सहा(३५),अर्णब सिंग उर्फ निल रॉय (२६) यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी ठाणे, रायगड,पुणे, मुंबई,नवी मुंबई , मुंबई , बंगलोर , चेन्नई आदींसह देशभरातील विविध शहरातुन अशाचप्रकारे अनेकांची फसवणुक करून लाखो रुपयांचा गंडा लावले असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलीस उपायुक्त अशोक दुधे व खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप टीडीआर यांच्या मार्गदर्शानुसार नेमलेल्या पथकामार्फत कोलकाता येथे आर इन्टरप्रायझेस डमडम या नावाने सुरू असलेल्या सर्व्हिस सेंटरवर रेड टाकून त्यांच्याकडील ४१ मोबाईल , २ लॅपटॉप व फसवणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे कागदपत्र जप्त केले आहेत. या गुन्ह्यात आणखी तीन आरोपी फरार असून त्यांचा आम्ही शोध घेत असल्याचे तपास अधिकारी महेश पाटील यांनी सांगितले. या आरोपीपैकी प्रबीर सहा हा तृतीयपंथी असून तो फोनवर बोलताना महिला व पुरुषाचे आवाज काढून ग्राहकाची दिशाभूल करीत असे.
संबंधित प्रकारात फसवणूक झालेल्यानी पोलिसांवर येऊन याबाबत माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. बदनामीची भीती पोटी अनेक जण फिर्याद नोंदविण्यासाठी पुढे येत नाहीत.या कारवाई तपास अधिकारी महेश पाटील यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक विक्रांत थारकर, पोलीस हवालदार बाबाजी थोरात आदींसह इतर तीन पोलीस नाईकांचा समावेश होता.
करोडो रुपयांची फसवणूक
वयक्तिक माहिती गोळा करून त्याच माहितीच्या आधारे संबंधित ग्राहकाला बदनाम करण्याची धमकी देत लॉकेटो ऑनलाईन डेटिंग सर्व्हिस व स्पीड डेटिंग या कंपनीचे काम चालत होते.केवळ एका ग्राहकाकडून ७३ लाखांची लूट केली जात असेल तर फसवणूक झालेले फिर्यादी समोर आले तर हा आकडा करोडो रुपयांच्या घरात जाणार आहे.